Google हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर आपण पहिल्यांदा गुगलवर सर्च करतो. मात्र आज या सर्च इंजिन असणाऱ्या गुगलने आज म्हणजेच २४ मार्चला आजचे डूडल एका अतिशय खास महिलेच्या ७७ व्या जयंतीनिमित्त बनवले आहे. ही अतिशय खास महिला अमेरिकेची असून त्यांचे नाव किट्टी ओ’नील आहे. त्यांना अमेरिकेची स्टंट वूमन म्हटले जाते. किट्टी ओ’नील यांना धोके पत्करून स्टंटबाजी करण्याची आवड होती. तसेच या रेसिंग कार देखील चालवू शकत होत्या. किट्टी ओ’नील यांच्याशी संबंधित आणखी रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
किट्टी ओ’नील यांचा जन्म २४ मार्च १९४६ मध्ये टेक्सासमधील कॉर्पस क्रिस्टी येथे झाला होता. हे ठिकाण अमेरिकेमध्ये आहे. त्यांची आई अमेरिकन होती तर वडील हे आयरिश होते. ओ’नील या लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होत्या. जेव्हा त्या ट्रॅकवर रेसिंग कार चालवून स्टंट करत असे, तेव्हा अनेक मोठे लोक त्यांच्या रेसिंगचा वेग सहन करू शकत नव्हते. यामुळेच त्यांना जगभरात ‘द फास्टेस्ट वुमन इन द वर्ल्ड’ म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा : WhatsApp च्या डेस्कटॉप युजर्ससाठी ‘हे’ जबरदस्त फिचर लॉन्च, फोनची बॅटरी संपली तरी करता येणार व्हिडिओ कॉल
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किट्टी ओ’नील यांना ऐकू येत नव्हते . अशा परिस्थितीमध्ये स्टंट करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. आपल्या बहिरेपणाला कमकुवतपणा न मानता त्यांनी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून लोकांशी संवाद साधण्याचा मार्ग शोधला. हळूहळू त्याला वॉटर डायव्हिंगची आवड निर्माण झाली, पण मनगटाच्या दुखापतीमुळे त्यांना वॉटर डायव्हिंगपासून दूर राहावे लागले. मात्र त्यानंतर त्या एक व्यावसायिक खेळाडू बनल्या . ओ’नील यांनी हेलिकॉप्टरमधून उडी मारण्यापासून ते स्कायडायव्हिंग करण्यापर्यंत अनेक स्टंट केले आहेत. ओ’नील या हॉलिवूडच्या सर्वात पहिल्या स्टंट वूमन होत्या.
ओ’नील यांनी जमीन आणि पाण्यावर एकूण २२ विक्रम केले आहेत. अशा या द फास्टेस्ट वुमन इन द वर्ल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओ’नील यांचे न्यूमोनिया या आजारामुळे २ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय हे ७२ होते. त्यांचे निधन दक्षिण डकोटा येथील युरेका येथे झाले. तसेच २०१९ मध्ये ओ’नील यांना ऑस्कर मेमोरिअम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.