Learn the FAANG job preparation strategy used by a student with backlogs to crack Google and Microsoft : एका भारतीय तरुणाने कॉलेजमध्ये अपयशाचा सामना केला तरीही त्याने जगातील दिग्गज टेक कंपन्यांमध्ये नोकरीची ऑफर मिळवली. या तरूणाची सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

कार्तिक मोदी नावाच्या तरुणाने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने शिक्षण घेताना आपल्याला कसे काही विषय अवघड जायचे याबद्दल माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणातो की, “नमस्कार, मी कार्तिक. मी गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबर, मेटा, अ‍ॅटलसियन आणि अगदी अ‍ॅमेझॉन यूकेमध्ये इंटरनॅशनल FAANG ऑफर मिळवली आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, कॉलेजमध्ये असताना मला डेटा स्ट्रक्चर्स या विषयात बॅकलॉग होता. चला, कॉफी घ्यायला जाऊ आणि असा व्यक्ती इथवर कसा पोहोचला हे मी तुम्हाला सांगतो.”

FAANG हा शब्द जगातील पाच सर्वात मोठ्या अमेरिकन कंपन्यांच्या नावांच्या अध्याक्षरांनी बनलेला आहे. या कंपन्यांमध्ये नोकरी मिळणे हे जगभरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि टेक प्रोफेशनल्सचे एक स्वप्न असते. ‘FAANG ऑफर’ म्हणजे यापैकी एका नामांकित कंपनीत मिळालेली नोकरीची संधी.

गोष्टी कशा बदलल्या?

कार्तिकने सांगितले की, खचून न जाता त्याने या अनुभवाचा वापर स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी प्रेरणा म्हणून केला. तो म्हणाला की, “माझ्या अवतीभोवती प्रत्येकजण प्लेसमेंट आणि मोठ्या पाच कंपन्यात (FAANG) नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागला होता, आणि मी इथे माझा बॅकलॉग क्लिअर करण्याच्या मागे लागलो होतो. तो बॅकलॉग हार मानण्यासाठीचे कारण ठरू शकला असता, पण त्याऐवजी माझ्या अभ्यासाची पद्धत बदलण्यासाठी तो एक प्रेरणा ठरला.”

कार्तिकने आपल्या अप्रोचमध्ये केलेले तीन बदल यावेळी अधोरेखित केले. तो म्हणाला की, “पहिल्यांदा, मी माझे बेसिक्स सुरूवातीपासून सुरू केले. कसलाही इगो ठेवला नाही. टॉपिक बाय टॉपिक, डीएसएचा अभ्यास असा केला जसे जणू काही माझा पहिला दिवसच आहे.”

तो पुढे म्हणाला, “दुसरी गोष्ट म्हणजे, मी सातत्य राखत दररोज १-२ सॉलिड प्रश्न सोडवण्यावर भर दिला, आणि मी सातत्य राखण्यासठी आठवड्यातून एकदाच ८ तास बसून अभ्यासाचा खोटा दिखावा केला नाही.”

तो पुढे म्हणाला, “तिसरी गोष्ट म्हणजे, मला शक्य होते त्या सर्व मुलाखतींसाठी मी जात राहिलो. प्रत्येक नकारानंतर मला हे स्पष्ट होत गेलं की मला अजून कशात सुधारणा करण्याची गरज आहे.”

अशाच अडचणींचा सामना करत असलेल्या इतरांना प्रोत्साहन देताना तो म्हणाला, “जर तुम्ही एखाद्या बॅकलॉगमुळे किंवा कमी सीजीपीए (CGPA) मध्ये अडकून पडला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ‘माझा खेळ आता संपला आहे’, तर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.”

या व्हिडीओवर ऑनलाइन अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कार्तिकचे म्हणणे पटल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले, हे खूप प्रेरणादायी आहे, विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना वाटते की एका बॅकलॉगमुळे सर्व काही संपते. दुसऱ्या एकाने म्हटले, सातत्य कशावरही मात करू शकते, हे इतक्या प्रामाणिकपणे सांगितल्याबद्दल धन्यवाद.