Signs Of Snakes In Home: पावसाळ्यात आपल्याला अनेकदा साप दिसतात. पावसाळ्यात साप जंगलात तयार केलेले बीळ सोडून लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आढळतात. फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही सापाचा वावर आढळून येतो. खरंतर पावसाळ्यात सापांच्या बीळांमध्ये पाणी शिरते ज्यामुळे त्यांना लपण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागा नसते. अशा परिस्थितीत आसऱ्यासाठी आणि आहाराच्या शोधात ते मानवी वस्तीमध्ये शिरतात. त्यामुळे अनेकदा आपल्या घराच्या आसपास, बागेत, स्टोअर रूम किंवा गटाराच्या आसपास साप दिसतात.
पावसाळ्यात तुमचे घर-बाग हे सापांचा अड्डा (वास्तव्याचे ठिकाण) होऊ शकते. साप घरात अशा ठिकाणी लपून बसलेले असू शकतात ज्याबाबत तुम्ही विचार देखील केला नसेल. याचा अर्थ असा नाही की, घरात साप शिरला आहे हे ओळखणे अशक्य आहे.
खरंतर विषारी साप घरात लपलेला असल्याच्या संकेतांकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. ही चूक एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. पण तुम्ही तुमची ही चूक सुधारू शकता. तुम्ही जर वेळीच हे संकेत ओळखले तर मोठा धोका टाळता येऊ शकतो.
चला जाणून घेऊ या ते ६ संकेत कोणते आहेत ज्यामुळे तुम्हाला समजेल की, तुमच्या घराच्या आसपास साप दडलेला बसला आहे.
१. घर किंवा बागेत सापाची कात सापडते : जर तुम्हाला घर किंवा गार्डनमध्ये, लाकडांच्या ढिगाऱ्यात/ढिगाऱ्याजवळ, जुन्या सामानात… किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये सापाने टाकलेली कात म्हणजे सापाची कातडी सापडली तर याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच सावध व्हा. सापाची कातडी ही पारदर्शक असते ज्यावर सापाच्या त्वचेचे व्रण दिसतात. पण कित्येकदा जुन्या कातडीचा अर्थ फक्त इतकाच आहे की, येथे साप येऊन गेला आहे. पण जर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सापाची कात सापडत असेल तर याचा अर्थ साप तुमच्या आसपास लपून बसलेला आहे.
२. कोपऱ्यांमध्ये विचित्र विष्ठा आढळणे : सापाची विष्ठा ही दिसायला उंदीर किंवा पक्ष्यांसारखीच दिसते पण यात फरक इतकाच आहे की, या विष्ठेमध्ये पांढरा भाग असतो आणि कित्येकदा त्यामध्ये पशुच्या अंगावरील केस किंवा हाडांचे तुकडे आढळतात. अशी विष्ठा स्टोअर रूम, लाकडांच्या ढिगारा किंवा कोपऱ्यांमध्ये वारंवार दिसत असेल तर वेळीच सावध राहा. साप तुमच्या आसपास असू शकतो.
३.धूळ किंवा ओल्या मातीवर सापाच्या सरपटण्याची खूण : सापाला पाय नसतात त्यामुळे जेव्हा तो सरपटतो तेव्हा तो धुळ आणि रेत किंवा ओल्या मातीवर सरपटण्याची खूण मागे सोडतो. जर अशी खूण तुम्हाला वारंवार दरवाज्याजवळ, गटार किंवा भिंतीच्या आसपास दिसत असेल तर साप त्याच मार्गे घरात येत जात आहे हे समजते.
४. अचानक उंदीर गायब होणे : जर तुमच्या घराच्या आसपास आधीपासून उंदीर दिसत असतील किंवा त्याचा आवाज येत असेल अन् अचानक ते गायब झाले किंवा त्यांचा आवाज येणे बंद झाले तर समजून जा की तुमच्या घराच्या आसपास एखाद्या सापाचा वावर आहे. कारण साप उंदराची शिकार करतात. या संकेताबरोबर जर तुम्हाला इतर संकेत दिसत असतील तर सावध राहा.
५. बंद ठिकाणी सतत विचित्र वास येणे : जर घराच्या आसपास तुम्हाला विचित्र वास येत असेल तर ते घराजवळ साप असल्याचा संकेत असू शकतो. खरंतर काही साप सौम्य, उग्र, तीव्र आणि कस्तूरीसारखा वास मागे सोडून जातात. जर स्टोअर रूम, शिड्यांच्या खाली, घराच्या छताखाली असलेली मोकळी जागा जिथे सामान ठेवले जाते अशा ठिकाणी वारंवार विचित्र वास येत असेल आणि सफाई करूनही हा वास जात नसेल तर अशा ठिकाणी सावधगिरी बाळगली पाहिजे.

६. सापाचे फुत्कारण्याचा आवाज किंवा नव्याने बीळ आढळणे : जर घराच्या परिसरात, बागेत, लाकडांजवळ, गटाराजवळ जर तुम्हाला सापाच्या फुत्कारण्याचा आवाज येत असेल किंवा मातीमध्ये नवीन बीळ आढळले तर ते अजिबात हलक्यात घेऊ नका. अशा परिस्थितीत सापाचे वास्तव्य असू शकते.
