प्रेमात पडल्यानंतर अनेक तरुणीचे स्वप्न असते की तिच्या जोडीदाराने तिला फिल्मीस्टाईलमध्ये प्रपोज करावे. आपल्या प्रेमाची कबुली द्यावी अन् लग्नासाठी मागणी घालावी. ही कल्पना फिल्मी वाटत असली हीच खऱ्या अर्थाने प्रेमाची कबुली आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता सर्वांसमोर आपल्या जोडीदारासाठी प्रेम व्यक्त करणे आणि आयुष्यभर साथ देण्याचे वचन देणे हीच एका नव्या आयुष्याची सुरुवात असते. कोणत्याही तरुणीसाठी असा जोडीदार मिळणे यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी असूच शकत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मात्र काही क्षण असे असतात की ते आयुष्यभरासाठी आठवणीत कोरले जातात. नाशिकमध्ये एका सैन्य प्रशिक्षण समारंभादरम्यान असाच एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला.

देशसेवेची नवी जबाबदारी स्वीकारण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या एका तरुण आर्मी पायलटने हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसत आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. या अनपेक्षित आणि भावनिक क्षणाने उपस्थितांची मने जिंकली, तर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्मी एव्हिएशनचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एका तरुण सैन्य अधिकाऱ्याने सर्वांसमोर हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसत आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. प्रेयसीनेही आनंदाने होकार दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत या प्रेमकहाणीचे स्वागत केले. या रोमँटिक क्षणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रातील नाशिक येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CAATS) मध्ये नव्या सैन्य वैमानिकांच्या पदवीदान (convocation) समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कठोर प्रशिक्षण पूर्ण करून अनेक तरुण अधिकारी सैन्य वैमानिक म्हणून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करत होते. मात्र या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते भरत भारद्वाज या अधिकाऱ्याने.

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भरत आपल्या गर्लफ्रेंड आरुषीला समारंभस्थळी उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरकडे घेऊन गेला. कुटुंबीय, मित्र, सहकारी अधिकारी आणि उपस्थित पाहुणे त्यांच्याकडे पाहत असतानाच भरत अचानक गुडघ्यावर बसला आणि त्याने आरुषीसमोर अंगठी धरत लग्नाची मागणी घातली.

क्षणभर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हेलिकॉप्टरच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा रोमँटिक क्षण पाहण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेल्या यशाचे प्रतीक असलेल्या त्या हेलिकॉप्टरसमोर भरतने आपल्या आयुष्यातील आणखी एका महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात केली.

आरुषीनेही आनंदाने या प्रस्तावाला होकार दिला. त्यानंतर संपूर्ण परिसरात टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष सुरू झाला. काही क्षणांपूर्वी नव्या वैमानिकांच्या यशाचा आनंद साजरा करणारे लोक या सुंदर प्रेमकहाणीचे साक्षीदार बनले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी याला “देशसेवा, यश आणि प्रेमाचा परिपूर्ण संगम” असे म्हटले आहे. काही नेटकऱ्यांनी भरतने वैमानिक म्हणून ‘विंग्स’ मिळवल्यानंतर लगेचच आयुष्याच्या नव्या प्रवासालाही सुरुवात केल्याचे सांगत त्याचे अभिनंदन केले.

viral helicopter proposal india
देशसेवेची शपथ अन् प्रेमाची कबुली! हेलिकॉप्टरसमोर आर्मी पायलटचं रोमँटिक प्रपोजल(फोटो सौजन्य – गुगल ट्रेंड)

तर काहींनी सैन्याच्या शिस्तबद्ध वातावरणात घडलेला हा भावनिक क्षण अत्यंत प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला असून लाखो लोकांची मने जिंकत आहे.