Best Roti For Summer: उन्हाळा सुरू होताच अनेकांना पोटासंबंधित आजार वाढू लागतात. यात पोट जड होणे, कधी गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या अचानक वाढू लागतात. याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता आणि जड अन्नपदार्थ खाणे. अशावेळी तुम्ही रोजच्या आहारात तांदूळ, ज्वारीच्या भाकरऐवजी थोड्या वेगळ्या पिठाची भाकरी खाणे फायदेशीर ठरेल. सहसा आपण रोज गव्हाची पोळी खातो, पण अशी काही पिठं आहेत जे शरीराला थंडावा देतात आणि पोट हलके ठेवतात. या पिठांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि पोट साफ होते.

या पिठांपासून बनवलेल्या भाकऱ्या चवीला चांगल्या लागतात आणि त्यांचा आहारात सहज समावेश करता येतो. जर तुम्हालाही उन्हाळ्यात निरोगी राहायचे असेल आणि पोटाच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर या खास पिठांपासून बनवलेल्या भाकऱ्या नक्की करून पाहा.

उन्हाळ्यात योग्य पीठ निवडणे का महत्त्वाचे आहे?

उन्हाळ्यात शरीरातील पाणी लवकर कमी होते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते; त्यामुळे जड किंवा कमी फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो, म्हणूनच हलके, थंड आणि भरपूर फायबरयुक्त पिठाच्या भाकऱ्या खाणे आवश्यक आहे.

best roti for summer digestion constipation relief
उन्हाळ्यात पोटाला आराम मिळण्यासाठी खा या ६ पौष्टिक पिठाच्या भाकऱ्या (फोटो – google)

१) जवस (बार्ली) पीठ

जवसाचे (बार्ली) पीठ उन्हाळ्यासाठी खूप चांगले मानले जाते. ते पोटाला थंडावा देते आणि त्यात फायबर भरपूर असते, त्यामुळे शौचास नरम होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, म्हणून गव्हाच्या पिठात तुम्ही जवसाचे पीठ मिसळून पोळ्या बनवू शकता.

२) ज्वारीचे पीठ

ज्वारी ग्लुटेन-फ्री असते आणि पचायला खूप हलकी असते, यामुळे ज्वारीच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि गॅस व आम्लपित्त कमी होते. उन्हाळ्यात हा एक उत्तम पर्याय आहे.

३) चण्याचे पीठ

चण्याचे पीठ उन्हाळ्यातील एक सुपरफूड मानले जाते. त्यात प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. चण्यापासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने पोट स्वच्छ होण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते, तसेच यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासही मदत होते.

४) नाचणीचे पीठ

सहसा हिवाळ्यात नाचणीची भाकरी खाल्ली जाते, परंतु योग्य प्रमाणात सेवन केल्यास ती उन्हाळ्यातही फायदेशीर ठरते. यामध्ये फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

best roti for summer digestion constipation relief
उन्हाळ्यात पोटाला आराम मिळण्यासाठी खा या ६ पौष्टिक पिठाच्या भाकऱ्या (फोटो – google)

५) ओट्सचे पीठ

आजकाल ओट्स घरोघरी सहज उपलब्ध असतात. त्यामध्ये एका विशिष्ट प्रकारचा फायबर असतो, जो मोठे आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो. नाश्त्यामध्ये ओट ब्रेड खाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

६) शिंगाड्याचे पीठ

शिंगाड्याच्या पिठात पोटाला थंडपणा देणारे गुणधर्म आहेत, त्याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यास मदत होते आणि पोट हलके राहते.

या पिठांपासून पोळ्या बनवायच्या की भाकऱ्या?

तुम्ही या पिठांपासून भाकऱ्या बनवू शकता किंवा गव्हामध्ये मिसळून पोळ्या बनवू शकता.