UP Teacher Demands from Female Teacher: उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील सरकारी शाळेत एक संतापजनक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारी शाळेत कर्मचाऱ्यांना हजेरी लावण्यासाठी डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली होती. मात्र त्यात त्रुटी आढळल्यानंतर पुन्हा एकदा जुनी पद्धत सुरू करण्यात आली. जुन्या पद्धतीनुसार ज्येष्ठ शिक्षक इतरांची हजेरी लावत आहेत. सध्या उन्नाव मधील एका सरकारी शाळेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला शिक्षिकेची हजेरी लावण्यासाठी पुरूष शिक्षक तिच्याकडे गालावर चुंबन देण्याची मागणी करत आहे. तर शिक्षिका यासाठी स्पष्ट नकार देत असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे? सोशल मीडियावर २६ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वरिष्ठ शिक्षक महिला शिक्षिकेला सांगतो की, तिने जर त्याची अट मान्य केली तर तिच्यासाठी सर्व काही सोपं होईल. "तुझ्या हजेरीचा विषय मी सांभाळून घेईल", असेही हा शिक्षक महिलेला सांगतो. महिला शिक्षक त्याला याबद्दल कोणती अट आहे? असा प्रश्न विचारते. त्यानंतर पुरूष शिक्षक आपल्या गालावर इशारा करून तिच्याकडून चुंबन मिळावे, अशी मागणी करतो. हे वाचा >> Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदू महिलांवर अत्याचार; खांबाला बांधून शिवीगाळ? नेमकं सत्य काय, वाचाच… शिक्षकाच्या या अश्लाघ्य मागणीनंतर महिला शिक्षिका त्याला साफ नकार देते. "मी यासाठी तयार नाही, ही घाणेरडी गोष्ट आहे", अशा शब्दात महिला शिक्षिका सदर शिक्षकाला सुनावते. यानंतरही समोरचा शिक्षक निलाजरेपणा दाखवत हसताना दिसत आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक यावर संताप व्यक्त करत आहेत. या शिक्षकाला ताबडतोब नोकरीवरून काढून टाकले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. तसेच त्याच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी नेटिझन्स करत आहेत. काही युजर्सनी म्हटले की, जेव्हा त्या शिक्षकाने स्वतःच्या गालावर इशारा केला, तेव्हा त्याच गालावर एक जोरात लगावून द्यायला हवी होती. कदाचित महिला शिक्षिकेला त्याचा इशारा व्यवस्थित समजला नसेल, असेही उपरोधिकपणे काही लोक म्हणत आहेत. हे ही वाचा >> ‘जीवापेक्षा रील महत्त्वाचे…’ वाहत्या ओढ्यात तरुणाने मारली उडी; पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप उत्तर प्रदेशमध्ये डिजिटल हजेरीचा सावळागोंधळ उत्तर प्रदेशमध्ये शाळेत डिजिटल हजेरीची प्रणाली बसविल्यानंतर त्यातील त्रुटीमुळे अनेकांनी यास विरोध केला, त्यानंतर ही प्रणाली बासनात गुंडाळण्यात आली. शिक्षकांनी या प्रणालीला विरोध केला आहे. आधी सरकारच्या इतर विभागात या प्रणालीचा अवलंब करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.