Grandfather Grandson Dance Video: देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच वेगळ्या आणि प्रेरणादायी गोष्टी शेअर करताना दिसतात. मात्र, यावेळी त्यांनी शेअर केलेल्या एका साध्या, पण मनाला भिडणाऱ्या व्हिडीओने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं; तर काहींचे डोळेही पाणावले. कारण- या व्हिडीओमध्ये दिसतं ते फक्त नृत्य नाही, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचणारी संस्कृती, जी प्रेम आणि परंपरेची सुंदर परंपरा आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक आजोबा आणि त्यांचा छोटासा नातू पारंपरिक लोकनृत्यावर ठेका धरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघांची ऊर्जा, ताल आणि एकमेकांशी असलेली जुळलेली केमिस्ट्री पाहून कुणीही भारावून जाईल. पांढरा पारंपरिक केडियू आणि धोतर परिधान केलेले आजोबा पूर्ण उत्साहाने नाचताना दिसतात; तर त्यांच्यासोबत उभा असलेला नातूदेखील त्याच जोशात पावलं टाकत त्यांना ‘तगडी टक्कर’ देताना दिसतो.
हा व्हिडीओ गुजरातमधील सौराष्ट्र भागातील डायरा या पारंपरिक लोककलेशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक संस्कृती, संगीत आणि लोकपरंपरेचं जिवंत दर्शन घडवणारी ही कला आजही अनेक ठिकाणी जपली जाते. मात्र, सोशल मीडियाच्या युगात अशा पारंपरिक गोष्टी फार कमी वेळा पाहायला मिळतात. त्यामुळेच हा व्हिडीओ लोकांच्या मनात घर करून गेला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रांनी लिहिलेली पोस्टही तितकीच भावनिक होती. त्यांनी म्हटलं, “हा व्हिडीओ माझ्या टाइमलाइनवर आला आणि मी तो का पाहायला सुरुवात केली हेच मला कळलं नाही. मला या नृत्याचं नावही माहीत नाही; पण यात एक आजोबा आपल्या नातवाला डान्सच्या स्टेप्स शिकवत असल्याचं दिसतं. या नृत्यात एवढी ऊर्जा आणि आनंद आहे की, ते पाहून स्वतःही त्यात सहभागी व्हावंसं वाटतं.”
पुढे त्यांनी जे लिहिलं, ते अनेकांच्या मनाला भिडलं. “मला सर्वांत जास्त स्पर्श करून गेली ती गोष्ट म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरा, ताल आणि आठवणी पोहोचण्याची भावना. आजच्या धावपळीच्या आणि सतत बदलणाऱ्या जगात काही गोष्टी कायम टिकून राहतात, याची जाणीव हा व्हिडीओ करून देतो,” असं त्यांनी नमूद केलं.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. एका युजरने लिहिले, “हीच आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ताकद आहे. जिथे आजोबांची परंपरा नातवाच्या हास्यात जिवंत राहते.” तर दुसऱ्याने म्हटले, “रील्स आणि दिखाव्याच्या काळात असा निरागस आणि मनाला शांतता देणारा व्हिडीओ पाहणं म्हणजे डोळ्यांना मिळणारा सुखद अनुभव आहे.”
आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे अनेक नाती दूर जात असल्याचं बोललं जातं. मात्र, हा छोटासा व्हिडीओ पाहिल्यानंतर अजूनही संस्कृती, परंपरा आणि कुटुंबातील नात्यांचं सौंदर्य जिवंत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.
