Viral Video : सातत्याने बरीच वर्ष नोकरी करून किंवा वयाची ५० वर्षे ओलांडल्यानंतर अनेकजण कामावरून निवृत्ती घेतात आणि आरामाचे जीवन जगतात. पण, काही जण असे असतात जे वयाची कितीही वर्ष ओलांडून गेली तरीही काही ना काही अनोखे करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात; तर आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका आजीने एकटीने दुचाकी चालवत ६०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केलं आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ एका आजीचा आहे. आजी आपली दुचाकी स्टार्ट करून प्रवास सुरू करतात. प्रवासादरम्यान दुचाकीवर स्वार होऊन आजी देवदर्शनासाठी थांबल्या आहेत. त्यांनी लूना मोपेड या दुचाकीवरून मध्यप्रदेशातील नीमच ते राजस्थानमधील रामदेवरापर्यंत दुचाकीवरून प्रवास केला आहे. दुचाकीवरून प्रवास करत त्यांनी ६०० किलोमीटरचं अंतर पार केलं आहे आणि या आनंदात आजी दुचाकीवर बसून नाचतानासुद्धा दिसत आहेत. तसेच आजूबाजूला जमलेली मंडळीदेखील आजीच्या या आनंदात सहभागी होताना दिसून येत आहेत. ६६ व्या वयात आजींचा उत्साह एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…




हेही वाचा… नव्या कपड्यांवर डाग पडला आहे का? मग बर्फ वापरा, चुटकीसरशी गायब होईल डाग; पाहा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ नक्की बघा :
६६ व्या वयात एकटीने केला दुचाकीवरून प्रवास :
दुचाकी चालवणाऱ्या आजींचं नाव सोहनबाई असे आहे आणि आजी ६६ वर्षांच्या आहेत. आजी मध्यप्रदेशच्या राहणाऱ्या आहेत. सोहनबाई या नीमच जिल्ह्याच्या मानसा तहसीलमध्ये राहतात. पूर्वी त्या लूना मोपेड या दुचाकीवरून दूध विकण्याचे काम करायच्या असे सांगण्यात येत आहे. आजींचा लूना मोपेडवरून प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे; पण त्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजींचा उत्साह पाहून व्हिडीओत अनेकजण त्यांचा आशीर्वाद घेत आहेत, तसेच काही जण आजींची विचारपूस करताना दिसून येत आहेत. या वयातसुद्धा आजींचा उत्साह आणि त्यांची प्रवास करण्याची जिद्द अगदी स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येत आहे.
आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर @roxstaraarya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि व्हिडीओला
‘मध्यप्रदेशातील नीमचहून रामदेवरा ६०० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास एकट्याने पूर्ण केला, जय बाबा रामदेवजी की…’ असे कॅप्शनदेखील देण्यात आले आहे. अनेकजण व्हिडीओ पाहून आजीला ‘दबंग आजी’ म्हणत आहेत. तसेच नीमच जिल्ह्याच्या मानसा तहसीलमध्ये राहणारे अनेक नागरिक, ‘ही आजी आमच्या मानसा तहसीलची आहे’ असे आवर्जून सांगत आहेत. तसेच अनेकजण प्रवासादरम्यान आजींसोबतच्या भेटींदरम्यानचे क्षण कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.