Uttar Pradesh Accident Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ हे रस्त्यावर झालेल्या अपघाताचे असतात. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होतात, तर काही अपघात हे समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे घडत असल्याचं दिसून येतं. आता अशाच प्रकारे एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

आपण गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे या घटनेतून पाहायला मिळत आहे. झालं असं की, उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये घराबाहेर थार गाडी खाली चिरडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. थार पार्किंग करत असताना नातवाकडून चुकून रिव्हर्स गिअर पडला आणि पाठिमागे उभा असलेल्या आजीचा चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत काय आहे?

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील एका घराबाहेर थार गाडी पार्क करण्यासाठी एक वृद्ध महिला आपल्या नातवाला मदत करत होती. तो त्यांच्या घराच्या आवारात गाडी पार्क करण्याचा प्रयत्न करत होता. गाडी गेटच्या आत गेल्यानंतर ती महिला घराचं गेट बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मात्र, गेट बंद करत असताना चालकाचं म्हणजे नातवाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

थार पार्किंग करताना नातवाकडून चुकून रिव्हर्स गिअर पडला आणि गाडी वेगाने पाठिमागे आली. मात्र, पार्किंगच्या जागेच्या प्रवेशद्वाराजवळच तीव्र उतार असल्याने गाडीचा वेग आणखी वाढला. यातच गाडीच्या पाठिमागे म्हणजे गेट बंद करण्याचा प्रयत्न करत असणारी आजी गाडीच्या वेगाने पाठिमागे ओढली गेली आणि काही अंतरावर असणाऱ्या भिंतीवर गाडी जोरात जाऊन आदळली. यामध्ये गाडी आणि भिंतीच्यामध्ये ही महिला सापडल्याने तिचा चिरडून मृत्यू झाला.

या घटनेवेळी वृद्ध महिला मदतीसाठी ओरडत होती. पण काही क्षणात ही घटना घडली. त्या महिलेला वाचवण्यासाठी तिचे कुटुंबीय घाईघाईने घटनास्थळी आले होते. पण तोपर्यंत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.