Wedding viral video: भारतीय लग्नांमध्ये सध्या फोटोशूटचा ट्रेंड जोरात आहे. प्रत्येक जोडपं आपला खास दिवस सुंदर कॅमेऱ्यात कैद व्हावा म्हणून खर्च करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. पण, कधी कधी या फोटोशूटचं ओझं लग्नाच्या आनंदाचं मातेरं करताना दिसतं. अशाच एका लग्नातील व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. नवरदेवानं फोटोशूटमध्ये अडथळा आल्यामुळे पाहुणे आणि मुलांवर राग व्यक्त केला आणि हे संपूर्ण प्रकरण कॅमेऱ्यात कैद झाल्यानं लोकांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत भारतीय लग्नातील फोटोशूटचा एक खास क्षण दाखवण्यात आला आहे. नवरदेव नवरी सजवलेल्या सोफ्यावर बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला नोटांचा वर्षाव सुरू आहे. हे शूट एक ‘ग्रँड मोमेंट’ कॅप्चर करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. पण, त्यादरम्यान अचानक काही मुलं स्टेजवर धावत आल्यानं फोटोशूटमध्ये अडथळा निर्माण झाला. त्यामुळे त्या क्षणी नवरदेवाचा संयम सुटला आणि त्यानं थेट मुलं आणि पाहुण्यांवर नाराजी व्यक्त केली.

व्हिडीओत दिसतंय की, फोटोशूट सुरू होताच एक छोटा मुलगा धावत नवरदेव-नवरीच्या फ्रेममध्ये येतो. हे पाहताच नवरदेव चिडतो आणि मुलाला हातानं हलकेच दूर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ते करताना त्याच्या चेहऱ्यावरील राग स्पष्टपणे दिसत होता. त्यानंतर तो माईक घेऊन पाहुण्यांना संबोधित करीत म्हणतो,

“आपापल्या मुलांना स्वतःजवळ बसवा. पैसे कमी आहेत, तर शूट खराब करू नका.” ‘पैसे कमी आहेत’ हे वाक्य ऐकताच लग्नातील वातावरण एका क्षणासाठी का होईना, पण तणावपूर्ण झालं. अनेकांना वाटलं की नवरदेवानं इतक्या छोट्या गोष्टीसाठी मुलं किंवा पाहुण्यांबाबत अशी घोषणा करणं योग्य नव्हतं. आणि हे सर्व कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्यानं सोशल मीडियावर लोकांनी त्याच्यावर कठोर टीका केली.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रियांमध्ये दोन टोकांची मतं पाहायला मिळाली. काही लोकांना वाटलं की, नवरदेवाचा राग योग्य नाही. लग्नात मुलं इकडे-तिकडे फिरणं साहजिकच आहे आणि फोटोशूट हा मुख्य उद्देश नसतो. एका युजरनं लिहिलं, “लग्न हे फोटोसाठी नसतं. हा एक पवित्र समारंभ आहे. आजकाल सगळा ड्रामाच झालाय.” तर दुसऱ्या युजरनं म्हटलं, “शूट खर्चीक असतं, त्यामुळे लोकांनी थोडी काळजी घ्यायला हवी; पण सार्वजनिकरीत्या असं बोलणं योग्य नाही.”

एकानं तर उपरोधानं लिहिलं, “असं वाटत असेल की, पाहुण्यांनी मुलांना घेऊन येऊ नये, तर घरातच फंक्शन करून यूट्यूबवर लाइव्ह केला असता!” तर काही जणांनी, मुलांच्या पालकांनाही जबाबदार धरत म्हटलं की, मुलांना स्टेजवर धावू न देणं ही त्यांचीही जबाबदारी आहे, असं मत नोंदवलं आहे.
हा व्हिडीओ एकीकडे लग्नातील ‘फोटोशूट संस्कृती’वर प्रश्नचिन्ह उभं करतो, तर दुसरीकडे अशा प्रसंगांमध्ये संयम आणि आदर किती महत्त्वाचा आहे हेही लक्षात आणून देतो. सोशल मीडिया या घटनेवर जशी चर्चा करीत आहे, त्यावरून स्पष्ट आहे की, लोकांना फोटोशूटपेक्षा लग्नातील मानवी भावनांचं महत्त्व जास्त वाटतं.