सोशल मीडियावर अनेक भक्तीमय वातावरण निर्माण करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात आता हरियाणातील तरुणांच्या ग्रुपचा हनुमान चालीसेच्या पठणात तल्लीन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हरियाणातील गुरुग्राममधील एका कॅफेबाहेर बसून हे तरुण हनुमान चालीसाचे पठण करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर आता नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिक्रिया येत आहेत.
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी हनुमान चालीसा पठण करण्यावरून मोठा राजकीय वाद पाहायला मिळाला. मात्र गुरुग्राममधील एका कॅफेहाबाहेर काही तरुण एकत्र येत अगदी आनंदात हनुमान चालीसेचे पठण करत आहेत. यामुळे नेहमी इंग्रजी आणि हिंदी गाणी ऐकू येत असलेल्या कॅफेबाहेर हनुमान चालीसेमुळे भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. या तरुणांनी हातात गिटार आणि डोकली घेत अगदी पारंपारिक पद्धतीने हनुमान चालीसा पठण केले. तरुणांना आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनीही त्यांना चांगली साथ दिली. या कॅफेबाहेरील लोकांपैकीच काहींना याचा व्हिडीओ शूट केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, दर मंगळवारी तरुणांचा हा ग्रुप कॅफेबाहेर बसून देवाचा जप करतात. ३ मिनिटांपेक्षा जास्त टायमिंगच्या या क्लिपमध्ये अनेक मुलं, मुली एकत्रितपणे टाळ्या वाजवत भक्तीगीताचे पठण करत आहेत. ANI आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तरुणांनी एकत्र येत हनुमान चालीसेच्या केलेल्या जल्लोषावर आता ट्विटर युजर्सही सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना तरुणांची ही आयडीया खूप आवडली आहे. पण व्हिडीओमधील हे तरुण कोण आहेत. ते कॉलेज स्टूडंट्स आहेत की नोकरी करणारे याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र तरुणांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरघोस रिअॅक्शन येत आहेत.