छान लांब सडक केस असावेत अशी अनेक महिलांची इच्छा असते पण एका मर्यादेच्यापुढे त्यांच्या केसाची वाढ पार खुंटते. यावर अनेक उपाय केले जातात पण काही वेळा अनुवांशिक गुणांमुळेच केसाची वाढ कमी असते. फ्लोरिडाच्या एका महिलेचे नशीब याबाबत तर अगदी हेवा वाटण्यासारखं आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण या महिलेचे केस तब्बल ११० फूट लांब आहेत. बसला ना धक्का? आशा मंडेला असे या महिलेचे नाव असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले आहे.

आशा मंडेला या ६० वर्षीय महिलेचे २००९ मध्ये सर्वात लांब केसासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले गेले. त्यांच्या एका केसाच्या बटेची लांबी १९ फूट आणि रुंदी ६. ५ इंच इतकी आहे. क्लेरमॉन्टमध्ये राहणार्‍या मंडेला म्हणाल्या की, ४० वर्षांपूर्वी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून युनायटेड स्टेट्समध्ये गेल्यावर त्यांनी केस वाढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजेच तब्बल ४० वर्षे त्यांनी केस कापलेले नाहीत. सध्याच्या घडीला मंडेला यांच्या केसाचे वजन तब्बल १९ किलो आहे. (Video: निव्वळ जादुई! दुर्मिळ इंद्रधनुष्याचा ढग पाहून नेटकरी झाले थक्क; तुम्हीही निसर्गाच्या प्रेमात पडाल)

मंडेला यांनी गिनीज बुकला सांगितले की, “मला ड्रेडलॉक्स हा शब्द आवडत नाही कारण मला वाटत नाही की माझ्या लॉक्सबद्दल काही भयंकर आहे. एखाद्या साधू किंवा ऋषीमुनींच्या केसाला विशिष्ट पद्धतीने सुकवून बांधले जाते त्याला ड्रेडलॉक्स म्हणता येईल पण माझे केस माझ्या डोक्यावर एका मुकुटाप्रमाणे मी मिरवते.”

मंडेला यांचे पती, इमॅन्युएल चेगे, नैरोबी, केनिया येथील एक व्यावसायिक लॉक स्टायलिस्ट, मंडेलाच्या केसांची देखभाल करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात खास वेळ देतात.चेगे आठवड्यातून एकदा मंडेलाचे केस धुतात, त्यांना एकदा केस धुण्यासाठी सहा बाटल्या शॅम्पू लागतात व केस पूर्ण सुकण्यासाठी दोन दिवस जातात. मानेवर केसाचे वजन पडू नये म्हणून त्या आपले केस एका कपड्यात गुंडाळून कंबरेला बांधून ठेवतात. भविष्यात सुद्धा त्यांना केस कापण्याची इच्छा नाही असेही त्यांनी सांगितले.