Gujarat Family Beats Doctor Video : गुजरातमधील भावनगरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरला तीन तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी महिला रुग्णास पाहण्यास आलेल्या नातेवाइकांना शूज बाहेर काढण्यास सांगितले; ज्यामुळे तीन नातेवाईक संतापले आणि त्यांनी भररुग्णालयात डॉक्टरांवरच हल्ला केला. त्यामुळे काही वेळातच रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्ड जणू काही कुस्तीचा आखाडा आहे की काय, असे वाटू लागते. या संतापजनक घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आरोपींविरुद्ध आता गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
भावनगर शहरातील सिहोर शहरातील श्रेया हॉस्पिटलमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत तिन्ही तरुणांना अटक केली.
भर रुग्णालयात डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण
समोर आलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी डॉक्टरांना मारहाण करणारे संशयित आरोपी रुग्णालयातील एका आजारी महिला नातेवाइकाला पाहण्यासाठी आले होते. जेव्हा ते इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णाशी बोलत होते तेव्हा डॉक्टर जयदीप सिंग गोहिल यांनी त्यांना बूट बाहेर काढण्यास सांगितले. त्यामुळे आरोपींना राग आला आणि त्यांनी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.
Read More Trending News : तुम्ही रस्त्यावर लिंबू सरबत पिताय? मग हा किळसवाणा Video पाहाच, पुन्हा पिण्यापूर्वी विचार कराल १०० वेळा
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, महिला रुग्ण बेडवर पडून आहे आणि तीन तरुण तिच्याशी बोलत आहेत. याचदरम्यान एक डॉक्टर तिथे येतो आणि रुग्णाजवळ उभ्या असलेल्या लोकांना बूट काढण्यास सांगतो. त्यावरून ते रागावले आणि पुढच्याच क्षणी डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्याला मारहाण करू लागले. धक्कादायक म्हणजे त्यांनी डॉक्टरला अक्षरश: जमिनीवर लोळवून मारहाण केली. तसेत मध्यस्थीला आलेल्या महिला नर्सलाही त्यांनी मारले. या घटनेत महिला रुग्णही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते; मात्र ते तरुण तिचे ऐकत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
भर रुग्णालयात झाली डॉक्टरला मारहाण, पाहा VIDEO
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भावनगर जिल्ह्यातील सिहोर शहरातील एका खासगी रुग्णालयात शूज काढण्यावरून राडा. या व्हिडीओवर आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, रुग्णाच्या नातेवाइकांनी छोट्याशा कारणावरून गडबड करण्याचा प्रयत्न केला. त्यात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा दोष नाही. त्याच वेळी दुसऱ्या एका युजरने म्हटले की, डॉक्टरांचे बरोबर होते. आणखी एका युजरने लिहिले आहे की, अतिशय लाजिरवाणी घटना, भांडण थांबविण्यासाठी रुग्णाला मध्यस्थी करावी लागली.