१२ सिंहांच्या सुरक्षाकवचात अॅम्ब्युलन्समधील मातेने दिला चिमुकल्याला जन्म

थरारक परिस्थितीत केली महिलेची यशस्वी प्रसूती

प्रातिनिधिक छायाचित्र

गिर अभयारण्य….मिट्ट काळोख…त्यातून एका गर्भवती महिलेला घेऊन जाणारी अॅम्ब्युलन्स…आणि १२ सिंहांनी घातलेल्या गराड्यामुळे अॅम्ब्युलन्समध्येच प्रसूत झालेली महिला…ऐकल्यावर चित्रपट किंवा कल्पनेतली गोष्ट वाटेल खरी. पण ही थरारक घटना नुकतीच प्रत्यक्षात घडली आहे.

मंगूबेन मखवाना या ३२ वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी ‘१०८’ या आपत्कालीन वैद्यकीय सुविधा देणाऱ्या क्रमांकावर फोन केला. काही वेळातच अॅम्ब्युलन्स दाखलही झाली. गुजरातमधील लुनारापूर अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या या महिलेला घेऊन अॅम्ब्युलन्स जाफराबाद येथील शासकीय रुग्णालयात निघाली होती. ही अॅब्युलन्स गिर अभयारण्यातून जात होती. रात्री २.३० वाजताच्या सुमारास महिलेला घेऊन जात असताना या अॅम्ब्युलन्सला अचानकपणे १२ सिंहानी घेरले.

बर्म्युडा ट्रँगलपाशी तयार झालं रहस्यमयी बेट

महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने बाळाचा कोणत्याही वेळी जन्म होण्याची शक्यता असल्याची शंका अॅम्ब्युलन्समधील आपत्कालीन व्यवस्थापन तंत्रज्ज्ञ अशोक मखवाना यांना आली. बाळाचे डोके बाहेर आल्याचे लक्षात येताच त्यांनी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले आणि त्यांनी महिलेची प्रसूती प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांकडून फोनवरुन सूचना घेत हे तंत्रज्ज्ञ प्रक्रिया करत होते. त्यावेळी आजूबाजूला माणसे असल्याची शंका आल्याने झाडांमधून सिंह बाहेर आले आणि त्यांनी गाडीला घेरले.

गाडीचा चालक स्थानिक असल्याने त्याला सिंहाच्या सवयींबाबत माहीती होती. त्यामुळे त्याने सिंहांना घाबरविण्यासाठी काही प्रयत्न केले. मात्र त्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद न देता ते उलट गाडीसमोर बसून राहीले. चालकाने या सिंहांच्या हालचालीवर लक्ष ठेवले तोपर्यंत मखवाना यांनी महिलेची अतिशय शांतपणे प्रसूती केली आणि महिलेने अतिशय गोंडस अशा मुलाला जन्म दिला.

हा सर्व थरार साधारण २० मिनिटे सुरु होता. प्रसूती पूर्ण झाल्यानंतर चालकाने सिंह हटावेत यासाठी गाडीचे लाईट दाखविण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळांनी अॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करुन दिली. आता महिला आणि बाळ यांना जाफराबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवरदेवाचा नागीण डान्स पाहून नवरीनं लग्नच मोडलं

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gujarat gir forest woman delivers in ambulance surrounded by 12 lions