Gwalior Instagram Break Up Story: हल्लीची तरुण पिढी इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय दिसते. रिल्स, स्टेटस, स्टोरी, स्ट्रिक यामुळे तरुणांना इन्स्टाग्राम सर्वात जवळचं वाटतं. इन्स्टाग्रामवरून काहीजणांची ओळख होते, ओळखीचं रुपांतर प्रेमात होतं. पण रिल्समध्ये हवा करणारे मुलं-मुली जेव्हा प्रत्यक्षात एकमेकांना भेटतात, तेव्हा इन्स्टाचे फिल्टर नसते. त्यामुळे खऱ्या आयुष्यातील माणसाला बघून धक्का बसतो. असाच एक धक्का ग्वाल्हेरमधील युवतीला बसला आहे. इन्स्टाग्रामवर ज्याचा फोटो, रिल्स पाहून आपण प्रेमात पडलो, तो प्रत्यक्षात बराच वयस्कर दिसत असल्याचे मुलीच्या लक्षात आले आणि तिने एका सेकंदात ब्रेकअप केलं. मात्र त्यानंतर जे घडलं, ते धक्कादायक होतं.
त्याचे केस पांढरे होते, वयही जास्त होतं.
ग्वाल्हेरची मुलगी इन्स्टाग्रामवर एका मुलाच्या प्रेमात पडली होती. अनेक महिने चॅटिंग केल्यानंतर दोघांनी एकमेकांना ऑफलाईन भेटण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे १९ वर्षीय मुलीला भेटण्यासाठी मुलगा ग्वाल्हेरला पोहोचला. पण प्रत्यक्षात मुलाला बघून मुलीला धक्का बसला. मुलाचे केस पांढरे झालेले होते. तो इन्स्टा प्रोफाइलपेक्षाही वयस्कर दिसत होता. दोघांच्या वयामध्ये १० वर्षांचे अंतर होते.
पहिली डेट ठरली शेवटची
इन्स्टाग्रामवरील मुलाचं नाव अरविंद बाथम असल्याचं कळतं. अरविंदनं मुलीला फॉलो करून तिला भाळण्याचा प्रयत्न केला. यासाठी तो सुंदर सुंदर फोटो अपलोड करू लागला. त्यांनी व्हिडीओ कॉलवरूनही संभाषण केलं. तसेच एकमेकांना फोटो आणि व्हिडीओ पाठवले. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण पहिलीच डेट त्यांची शेवटची डेट ठरली.
मुलानं खासगी व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केले
मुलीने पहिल्याच भेटीत अपमान करून नकार दिल्यामुळे मुलाचा तिळपापड झाला. सूड घेण्याच्या भावनेने पेटलेल्या अरविंदने मुलीने पाठवलेल्या खासगी व्हिडीओचा चुकीचा वापर केला. हे व्हिडीओ मॉर्फ करून त्याने व्हायरल केले. जेणेकरून मुलीची बदनामी होईल. यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात २९ वर्षीय अरविंद विरोधात तक्रार दाखल केली.