एका तेरा वर्षीय चिमुकलीच्या पोटातून अर्धा किलो मानवी केस आणि शाम्पूची रिकामी पाकिटं डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये हा प्रकार घडला आहे.

सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीच्या पोटात गेल्या काही महिन्यांपासून दुखत होते. त्यामुळे तिचे पालक तिला तपासणीसाठी येथील व्हीजीएस या खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीच्या पोटाचे स्कॅनिंग केले. यामध्ये तिच्या पोटामध्ये चेंडूच्या आकाराचा एक गोळा दिसून आला. मात्र, ते नक्की काय आहे हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे तिच्या पोटातील हा गोळा बाहेर काढण्याचे ठरवले. रुग्णालयाचे अध्यक्ष व्ही. जी. मोहनप्रसाद यांनी याबाबत माहिती दिली.

एन्डोस्कोपीद्वारे पोटातील गोळा बाहेर काढण्यास सुरुवातीला डॉक्टरांना अपयश आले त्यानंतर डॉक्टर गोकुळ कृपाशंकर आणि त्यांच्या टीमने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला आणि त्या चिमुकलीच्या पोटातून हा गोळा बाहेर काढला. धक्कादायक बाब म्हणजे हा गोळा म्हणजे तब्बल अर्धा किलो वजनाचा मानवी केसांचा पुंजका होता. तसेच त्यात काही शाम्पूची रिकामी पाकिटंही होती.

मुलीनं केस आणि शाम्पूची पाकिटं का खाल्ली?

शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या पोटातून यशस्वीरित्या केस आणि शाम्पूची पाकिटं बाहेर काढण्यात आली असली तरी तिनं हे का खाल्लं असावं? हा प्रश्न सर्वांसमोर होता. याबाबत त्या मुलीकडे चौकशी केल्यानंतर याचा खुलासा झाला. तिने डॉक्टरांना सांगितले की, एका जवळच्या नातेवाईकाचा अचानक मृत्यू झाल्याने याचा धक्का तिला बसला होता. त्यामुळे तीचे मानसिक स्वास्थ बिघडले होते. त्यामुळे ती मानवी केस आणि शाम्पूची पाकिंट खात होती. अशा प्रकारे बाहेरील अनावश्यक वस्तू तिच्या पोटात गेल्यामुळे तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या होत्या. दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर संबंधित मुलगीची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.