Chanakya Niti for Relatives : आचार्य चाणक्य यांची गणना त्यांच्या काळातील अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानी महापुरुषांमध्ये केली जाते. शतकांपूर्वी त्यांनी दिलेल्या शिकवणी आजच्या काळातही लोकांना योग्य मार्ग दाखवीत आहेत. मानवाला योग्य दिशा दाखवणाऱ्या त्यांच्या याच विचारांना आज आपण ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखतो. आपल्या नीतींमध्ये त्यांनी आपण इतरांशी कसे वागावे, विशेषतः जेव्हा आपण एखाद्या नातेवाइकाच्या घरी जातो तेव्हा कसे वर्तन असावे, हेदेखील स्पष्ट केले आहे.

चाणक्य यांच्या मते, नातेवाइकाच्या घरी जाणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु, अनेकदा आपण नकळत त्यांच्या घरी जाऊन अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपली प्रतिमा पूर्णपणे मलीन होते आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातील आपल्याबद्दलचा आदर संपून जातो. आज अशाच ५ गोष्टींबद्दल जाणून घेऊ, ज्यांची काळजी नातेवाइकांकडे जाताना घेतलीच पाहिजे.

१. न सांगता किंवा निमंत्रणाशिवाय कधीही जाऊ नका

आचार्य चाणक्य यांच्या मते, सर्वांत पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही नातेवाइकाच्या घरी न सांगता किंवा अचानक जाऊ नये. काही वेळा तुम्ही ज्यांच्याकडे जाणार ती व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या कामात व्यग्र असू शकते किंवा बाहेर जाण्याच्या तयारीत असण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही अचानक त्यांंच्याकडे पोहोचल्यास त्यांचे नियोजित काम बिघडू शकते आणि त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणूनच कोणाकडेही जाण्यापूर्वी त्यांना पूर्वकल्पना नक्की द्या, जेणेकरून ते तुमचे स्वागत चांगल्या प्रकारे करू शकतील.

२. घरातील वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू नका

प्रत्येक घराचे स्वतःचे काही नियम आणि पद्धती असतात. चाणक्य यांच्या मते, जेव्हा तुम्ही नातेवाइकाच्या घरी जाल तेव्हा त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये विनाकारण हस्तक्षेप करू नका किंवा त्यांना न मागता सल्ला देण्याची चूक करू नका. ते आपले घर कसे चालवत आहेत, मुलांचे संगोपन कसे करत आहेत किंवा आपला पैसा कुठे खर्च करत आहेत, या गोष्टींवर त्यांनी स्वतःहून विचारल्याशिवाय आपले मत मांडू नका. इतरांच्या वैयक्तिक आयुष्यापासून तुम्ही जितके दूर राहाल, तितके ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

३. नातेवाइकाच्या घरी कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका

चाणक्य नीतीनुसार, जेव्हा तुम्ही एखाद्या नातेवाइकाकडे किंवा मित्राकडे जाता, तेव्हा कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. तुमच्या क्षमतेनुसार काही ना काही नक्की घेऊन जावे, जसे की फळे, मिठाई किंवा मुलांसाठी एखादी लहान भेटवस्तू. तुम्ही असे करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला खूप आनंद होतो आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रेम व आदर घेऊन आला आहात, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते.

४. गरजेपेक्षा जास्त दिवस राहू नका

कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जाणे ही चांगली गोष्ट आहे; पण तिथे गरजेपेक्षा जास्त वेळ थांबल्याने किंवा जास्त दिवस राहिल्याने तुमचा मान-सन्मान कमी होतो. तुम्ही कितीही जवळचे नातेवाईक असलात तरी काही दिवसांनंतर समोरच्या व्यक्तीला तुमच्या उपस्थितीमुळे थोडी अडचण वाटू शकते. त्यामुळे कोणाच्याही घरी तितकाच वेळ राहा, जितका आवश्यक असेल. तेथून तुम्ही योग्य वेळी तुमच्या घरी परतल्याने तुमचा आदर नेहमी टिकून राहील.

५. गोड बोला आणि चहाडी-चुगली करणे टाळा

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणाच्याही घरी गेल्यावर आपल्या संपत्तीचा किंवा मोठ्या गोष्टींचा अहंकार कधीही दाखवू नये. नेहमी सर्वांशी प्रेमाने आणि आदराने बोला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे बसून इतर कोणत्याही नातेवाइकाची बदनामी किंवा चहाडी अजिबात करू नका. चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती इतरांची निंदा करते, तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आणि लोक त्या व्यक्तीपासून दूर राहणेच पसंत करतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)