Chanakya Niti Tips For Career Growth : जीवनात यश केवळ नशिबाने मिळत नाही, तर त्यासाठी योग्य विचार, शिस्त आणि चांगल्या सवयी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एकदा का तुम्ही जीवन जगण्याचा रस्ता भरकटलात तर तुम्हाला योग्य वळणावर येणं फार अवघड होते. यात काही सवयी माणसाला अपयशी आणि कंगाल बनवतात. यावर आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नितीमध्ये मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे तुम्हालाही वैयक्तिक जीवनात यश मिळवायचे असेल आणि योग्य निर्णय घ्यायचे असतील तर चाणक्यांचे खालील सल्ले नक्की फॉलो करा.

चाणक्य सांगतात की, नकारात्मक सवयींचा त्याग करून आणि योग्य दिशा पकडून आपण आपले जीवन अधिक चांगले बनवू शकतो. आज आपण चाणक्य यांच्या अशाच काही विचारांबद्दल आणि नीतींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आपल्याला जीवनात केवळ यश मिळवून देण्यासच मदत करत नाहीत, तर संकटकाळातही सकारात्मक विचारांसह पुढे जाण्याची प्रेरणा देतात.

१) स्वतःची स्तुती करणे टाळा

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने नेहमी स्वतःची स्तुती करणे टाळले पाहिजे. जर एखादी व्यक्ती सतत स्वतःचेच कौतुक करत राहिली आणि स्वतःलाच सर्वोत्कृष्ट समजू लागली, तर लोक तिच्याशी बोलणे टाळतात. अशा व्यक्तींना केवळ सामाजिक संबंध निर्माण करण्यातच अडचणी येत नाहीत, तर त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही यश मिळवणे कठीण होते.

चाणक्य यांच्या मते, जे लोक असे मानतात की त्यांना प्रत्येक गोष्टीची पूर्ण माहिती आहे आणि जे इतरांच्या बुद्धिमत्तेला किंवा योगदानाला कमी लेखतात, ते अनेकदा स्वतःच स्वतःच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा बनतात. हा अहंकार त्यांना नवीन गोष्टी शिकण्यापासून आणि इतरांचे सहकार्य घेण्यापासून रोखतो.

२) कामात टाळाटाळ करण्याची सवय

आचार्य चाणक्य यांच्या मते, आजचे काम उद्यावर ढकलणे किंवा कामात टाळाटाळ करण्याची सवय यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जी व्यक्ती आपली कामे वेळेवर पूर्ण करत नाही, ती अनेकदा मागे पडते. अशा व्यक्तीला आपले ध्येय साध्य करण्यात मोठ्या अडचणी येतात.

या सवयीमुळे हातातील चांगल्या संधी निघून जातात, कामाचा ताण वाढतो आणि पर्यायाने आत्मविश्वासातही घट होऊ लागते. चाणक्य म्हणतात की, वेळेचे महत्त्व समजून घेणे आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण करणे हा यश मिळवण्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जे लोक आजचे काम आजच पूर्ण करतात, ते केवळ संधींचा योग्य वापर करत नाहीत, तर स्वतःचा आत्मविश्वास आणि शिस्तही मजबूत करतात. म्हणूनच, टाळाटाळ करण्याची सवय सोडून वेळेचा योग्य वापर करणे माणसाला यशस्वी बनवते.

३) इतरांना कमी लेखण्याची किंवा अपमान करण्याची सवय

आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती इतरांचा अपमान करते किंवा त्यांना नीचा दाखवण्याचा प्रयत्न करते, ती केवळ इतरांच्या नजरेत स्वतःचा आदर गमावत नाही, तर असे करून ती स्वतःचेच नुकसान करत असते. अशा लोकांना वाटते की इतरांना कमी दाखवून स्वतःला मोठे सिद्ध करता येते, परंतु वास्तविकता याच्या अगदी उलट असते. इतरांवर टीका करणे आणि त्यांना कमी लेखण्याच्या सवयीमुळे व्यक्तीचे नातेसंबंध कमकुवत होतात. चाणक्य म्हणतात की, खरे मोठेपण इतरांना कमी लेखण्यात नसून, त्यांच्याशी समजूतदारपणा, सहकार्य आणि आदराने वागण्यात दडलेले असते.

४) आपल्या गुप्त गोष्टी उघड करणे टाळा

आचार्य चाणक्य यांच्या मते, आपले आयुष्य, आपल्या योजना आणि वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करणे अनेकदा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकते. जेव्हा आपण आपल्या गुप्त योजना आणि विचार विचार न करता इतरांसमोर मांडतो, तेव्हा ते केवळ आपल्या धोरणांना कमकुवत करत नाही, तर आपल्या हातातून संधी देखील हिरावून घेऊ शकते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)