Navratri Fast During Pregnancy : शारदीय नवरात्रीचा हा पवित्र सण केवळ धार्मिक मान्यतेशीच नव्हे, तर निसर्गाशीही जोडलेला आहे. हे दिवस हिवाळ्याच्या आगमनाचे मानले जातात आणि म्हणूनच आपल्या आरोग्यासाठीही हा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. या काळात फलाहार आणि हलक्याफुलक्या सात्विक आहार खाणं फायदेशीर मानले जाते. पण काही परिस्थितींमध्ये उपवास करणे टाळावे, कारण हा काही तासांचा नव्हे तर ९ दिवसांचा काळ असतो. काही महिला दोन्ही नवरात्रींचे उपवास करतात आणि याच कारणामुळे त्यांचे हे नियम मोडू नयेत अशी त्यांची इच्छा असते, परंतु प्रेग्नेंसीमध्ये महिला उपवास करू शकतात का? याविषयी आपण आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊ…

आज म्हणजेच ११ ऑक्टोबर २०२६ पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झाली आहे. घटस्थापनेसह हा ९ दिवसांचा सण उत्साहात साजरा केला जातो. हा शक्तीच्या आराधनेचा सण आहे, परंतु शरीराला कष्ट देऊन उपवास करण्याचे नियम सांगितलेले नाहीत. अशा स्थितीत जेव्हा तुम्ही सक्षम नसाल, तेव्हा उपवास करू नयेत, असे म्हटले जाते. गर्भावस्थेत उपवास केल्याने काय होऊ शकते, ते जाणून घेऊया.

गर्भावस्थेत उपवास करणं कितपत सुरक्षित?

यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल टाउन नवी दिल्लीच्या डायरेक्टर आणि विभागप्रमुख (ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजी) डॉ. सोनल बाथला यांनी एका हिंदी वेबसाईट्शी बोलताना माहिती दिली की, गर्भधारणेच्या काळात ९ दिवस उपवास करणे प्रत्येक महिलेसाठी सुरक्षित नाही.

Navratri fast during pregnancy
नवरात्री २०२६ आणि उपवास (फोटो – google trends)

गर्भावस्थेत जास्त पोषणाची असते गरज

डॉ. सोनल बाथला यांचे म्हणणे आहे की, गर्भावस्थेच्या काळात शरीराला अतिरिक्त काळजीची गरज असते, कारण आई आणि बाळ दोघांसाठीही पुरेशा पोषणाची आवश्यकता असते. यासह शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी भरपूर हायड्रेशन (पाण्याचे प्रमाण) असणेही अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ उपवास करणे किंवा अन्न-पाणी खूप कमी करणे योग्य नाही.

डॉक्टरांचा सल्ला आणि आहार

तज्ज्ञ म्हणतात की, जर गर्भवती महिलेला उपवास करायचा असेल, तर त्यांनी आपल्या गर्भधारणेच्या स्थितीनुसार याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जर उपवास करतच असाल, तर या काळात दीर्घकाळ भुकेले राहणे टाळा. फळांपासून ते दूध, दही, पनीर, सुकामेवा आणि इतर पौष्टिक उपवासाचे अन्न आपल्या आहारात समाविष्ट करा. याशिवाय पुरेसे पाणी पिणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे.

आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे

तज्ज्ञ म्हणतात की, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. जर तुम्हाला चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या, अस्वस्थता किंवा जास्त थकवा जाणवत असेल तर उपवास सुरू ठेवू नका. अशा परिस्थितीत या काळात आई आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे, अन्यथा गर्भावस्थेत तुम्हाला गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.