Pune Auto Driver Abusing Girl: मनाप्रमाणे भाडे आकारणे, प्रवाशांशी हुज्जत घालणे आणि उद्धट वर्तन करणे, पुणेकर रिक्षाचालकांबाबत अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात. सध्या एका तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तिने पुणेरी रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये रिक्षाचालक महिलेशी अत्यंत गैरवर्तणूक करताना स्पष्टपणे दिसत आहे.

पुण्याच्या रिक्षाचालकावर भडकली महिला

पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रगत आणि राहण्यायोग्य शहर मानले जाते. मात्र, शहराची प्रतिमा तिथल्या नागरिकांच्या वर्तणुकीवरही अवलंबून असते. इंस्टाग्राम युजर रिमझिम हिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्हिडीओमध्ये प्रामुख्याने रिक्षाचालक स्वतःच्या मर्जीने भाडे कसे ठरवतात, या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

पुण्यात घराबाहेर पडणे कठीण

व्हिडीओच्या सुरुवातीला रिक्षाचालक आणि रिमझिम यांच्यात जोरदार वादावादी होताना दिसते. या अनुभवानंतर हताश होऊन रिमझिम म्हणते की, “पुण्यात घराबाहेर पडणे आता अशा प्रकारचे (त्रासदायक) झाले आहे.”

“तुमच्या मर्जीनुसार रेट चालणार नाहीत. जादा पैसे मागणे, अ‍ॅटिट्यूड दाखवणे आणि बोलण्याची पद्धत… हे सर्व अत्यंत चुकीचे आहे. केवळ योग्य भाडे मागितले म्हणून अशा प्रकारची वागणूक दिली जाते.” – रिमझिम

नेमकी घटना काय होती?

रिमझिमने व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये घडलेला प्रकार सविस्तर सांगितला आहे. ती आणि तिची मैत्रीण स्कूटीवरून जात असताना एका रिक्षाचालकाने त्यांच्यावर अश्लील टिप्पणी करण्यास सुरुवात केली. रिमझिमने तात्काळ त्याला हटकले आणि त्याच्या या वर्तणुकीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यांच्या रिक्षामधून प्रवास करताना एकतर ते जास्त भाडं आकारतील किंवा घेऊन जायलाच नकार देतील किंवा मग काहीच नाही तर विनाकारण तुम्हाला त्रास देतील असे रिमझिमने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘एका दिवसात श्रीमंत व्हायचे आहे का?’

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांनी रिमझिमला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. नेटिझन्सनी रिक्षाचालकांच्या वृत्तीवर कडाडून टीका केली आहे: एका युजरने लिहिले, “या लोकांना एका दिवसात श्रीमंत व्हायचे आहे.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “पुण्यातील रिक्षाचालक खरोखरच गरजेपेक्षा जास्त भाडे उकळतात आणि विरोध केल्यास दादागिरी करतात.” या घटनेमुळे पुण्यातील रिक्षा प्रवासाच्या सुरक्षिततेचा आणि मीटरप्रमाणे भाडे आकारणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.