भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० सामना झाल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वेगळाच वाद पाहायला मिळत असताना भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज हरभजन सिंग यांच्यामध्ये जोरदार ट्विटर वॉर सुरू झालं आहे. मोहम्मद आमिरच्या ट्वीट्समुळे भडकलेल्या हरभजननं शेवटी यूट्यूबवर एक भलामोठा व्हिडीओ पोस्ट करून मोहम्मद आमिरला चांगलंच सुनावलं आहे. यावेळी बोलताना हरभजन सिंगनं स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची देखील आठवण काढली आहे. हरभजन सिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अवघ्या २४ तासांत त्याच्या व्हिडीओला जवळपास दीड लाख व्यूज आणि वीस हजार लाईक्स मिळाले आहेत.

नेमका वाद काय आहे?

हरभजन सिंगनं आपल्या व्हिडीओमध्ये हा सगळा वाद सांगितला आहे. या वादाला सुरुवात मोहम्मद आमिरच्या ट्वीटनं झाली. पाकिस्ताननं भारताचा पराभव केल्यानंतर मोहम्मद आमिरनं हरभजन सिंगला ट्विटरवर छेडत “घरातला टीव्ही तर नाही फोडलास ना?” असा खोचक प्रश्न केला. यावरून संतापलेल्या भज्जीनंही त्याला त्याच शब्दांत उत्तर दिलं. ट्विटरवरच या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर शेवटी हरभजननं लॉर्ड्सवरच्या मॅचमध्ये मोहम्मद आमिरनं केलेल्या स्पॉट फिक्सिंगची आठवण करून दिली. याच मुद्द्यावरून त्यानं यूट्यूबवर टाकलेल्या व्हिडीओमधून मोहम्मद आमिरला सुनावलं आहे.

“मोहम्मद आमिर आहे कोण?”

“मोहम्मद आमिर आहे कोण? लॉर्ड्समध्ये एवढा मोठा नो बॉल कसा पडला होता? आपल्या सगळ्यांना माहितीये तिथे काय घडलं होतं. त्यानं काय केलं होतं. मी जास्त चिखलात शिरलो तर शिंतोडे माझ्याच अंगावर उडणार आहेत. मी त्याच्यावर बोलावं ही आमिरची लायकीच नाही. मला त्याच्याविषयी जास्त बोलायचं नाहीये. त्यानं जागतिक क्रिकेटवर काळा डाग लावला आहे”, असं हरभजन सिंग म्हणाला आहे.

“…ही माझीच चूक होती”

दरम्यान, लॉर्ड्सवरच्या त्या नो बॉलवरून हरभजननं मोहम्मद आमिरला ऐकवलं आहे. “ज्या व्यक्तीने क्रिकेटला विकलं, देशाला विकलं, आपला इमान विकला, जो हे सगळं विकून लॉर्ड्समध्ये नो बॉल टाकून पैसे कमवायच्या प्रयत्नात होता, त्याच्यासमोर मी काही बोलणं ही माझी चूक होती. त्याची तेवढी पात्रता नाही”, असं हरभजन या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.

हरभजन ट्विटरवरच टीम इंडियाची मस्करी करणाऱ्या पत्रकाराला भिडला, म्हणाला…!

“तू कोण आहेस मध्ये या चर्चेत पडणारा? तू काय आहेस हे तू लॉर्ड्सवर दाखवून दिलं आहेस. फार बोलू नकोस. तू देशाला विकलंस आणि तिथले पत्रकार तुला पाठिंबा देतात. आमच्या आयुष्यापासून दूर होऊन जा”, असंही हरभजन सिंगनं या व्हिडीओत म्हटलं आहे.

काय घडलं होतं ‘त्या’ सामन्यात?

२०१०मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यामध्ये जाणून बुजून नो बॉल टाकून स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप मोहम्मद आमिरवर ठेवण्यात आला होता. तो आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर ५ वर्ष क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. या प्रकाराविषयी मोहम्मद आमिरनं माफी देखील मागितली होती.