Harihar Fort Crowd Viral Video : महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील अद्भुत आणि तितकाच थरारक मानला जाणारा किल्ला म्हणजे ‘हरिहर किल्ला’. ९० अंशाच्या कोनात असलेल्या खड्या आणि खडकात कोरलेल्या पायऱ्यांसाठी हा किल्ला जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या या किल्ल्यावर चित्रित केला गेलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो पाहून ट्रेकर्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये हरिहर किल्ल्याच्या अरुंद, उभ्या पायऱ्यांवर पर्यटक आणि ट्रेकर्सची तुफान गर्दी दिसून येत आहे. पायऱ्यांवर एकामागे एक रांग लावून लोक अत्यंत धोक्याच्या स्थितीत पुढे सरकत आहेत. या किल्ल्यावर ट्रेकिंग करणे म्हणजे अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव असतो; पण इतक्या मोठ्या संख्येने ट्रेकर्सनी एकाच वेळी गर्दी केल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
X (पूर्वीचे ट्विटर)वर @JosD92official या युजरने किल्ल्यावरील भीतीदायक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये उपरोधिकपणे लिहिलेय, “इतके तर मुघल सैनिकही या किल्ल्यावर हल्ला करायला आले नसतील!”
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिले, “फक्त एक चूक आणि मोठा अपघात घडू शकतो.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रशासनाला सल्ला देत म्हटले, “अशा गर्दीत एकाचाही पाय घसरला, तर खाली असलेल्या इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अंधारबन (Andharban) ट्रेकप्रमाणे प्रशासनाने इथेही नोंदणी पद्धत सुरू करून ठरावीक लोकांनाच प्रवेश दिला पाहिजे.”
तर काही लोकांनी याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहताना म्हटले, “भारतात आता लोकांची आर्थिक स्थिती सुधारत आहे आणि लोक घराबाहेर पडत आहेत. मात्र, पर्यटनस्थळे मर्यादित असल्यामुळे अशी गर्दी होत आहे.” तर काहींनी, “अशा गर्दीत स्वतःचा एक सिंगल फोटो काढणेही कठीण झाले आहे,” अशी खंत व्यक्त केली.
हरिहर किल्ल्याचे वैशिष्ट्य
नाशिक जिल्ह्यातील हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३,६७६ फूट (१,१२० मीटर) उंचीवर त्रिकोणी खडकावर वसलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी खडकात कोरलेल्या ११७ पायऱ्या हा या ट्रेकचा सर्वांत थरारक भाग आहे. अत्यंत तीव्र उतार आणि अरुंद मार्ग असल्यामुळे पावसाळ्यात किंवा गर्दीच्या वेळी येथे अपघात होण्याचा धोका मोठा असतो.
