Viral Today: मागील दोन दिवसांपासून दिवाळीचे खूप मॅसेज आले असतील ना? सगळ्यांचे मॅसेज वाचलेत की आपलं तेच तुम्हालाही शुभेच्छा असे रिप्लाय करून मोकळे झालात? मंडळी जर असं केलं असेल तर आधी हर्ष गोएंका यांनी सांगितलेला हा किस्सा वाचा व लगेच जाऊन तुमचे मॅसेज तपासून घ्या. आपल्यापैकी अनेकांना मॅसेज पूर्ण न वाचता रिप्लाय करायची सवय असते, विशेषतः सणांच्या दिवसात तर आपण मॅसेजना कंटाळतो की कोणी काहीही पाठवलं तरी हो तुम्हालाही असे रिप्लाय न बघताच केले जातात. असंच केलेला एक डॉक्टर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वतः हर्ष गोएंका यांनी हे ट्वीट करून हा किस्सा सांगितला आहे.
हर्ष गोएंका यांनी ट्वीटच्या कॅप्शनमध्ये म्हंटल्याप्रमाणे, मुलीचे पोट बिघडल्याने त्यांनी दिवाळीच्या दिवशीच डॉक्टरांना मॅसेज केला होता. मी मुलीला काय औषध देऊ असंही त्यांनी विचारलं होतं. कदाचित डॉक्टरसाहेब यावेळी घाईत असल्याने त्यांनी हा मॅसेज वाचलाच नसावा व त्यांना हा दिवाळीच्या शुभेच्छ अदेणारा मॅसेज वाटला यावर त्यांनी केलेला रिप्लाय पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. डॉक्टर म्हणतात, तुमच्या सर्व कुटुंबालाही याच शुभेच्छा, तुम्ही प्रत्येक क्षणाची मज्जा घ्या, ब्लास्ट होऊ द्या! खरंतर दिवाळीच्या दृष्टीने केलेला हा मॅसेज वरच्या मॅसेजला इतका विसंगत ठरतोय की तो वाचून नेटकरीही लोटपोट होत आहेत.
हर्ष गोएंका ट्विट
दरम्यान, हर्ष गोएंका यांच्या या ट्वीटवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही मज्जा केलीत ना? अशाही कमेंट करत त्यावर मजेशीर स्टिकर व जीआयएफ नेटकऱ्यांनी पोस्ट केले आहेत. तर यातून शिकण्यासारखी गोष्ट इतकीच की निदान थोडक्यात का होईना पण मॅसेज वाचून रिप्लाय देत जा जेणेकरून अशी फजिती टाळता येईल.