तीन मिनिटांच्या झूम कॉलमध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या CEO वर संतापले हर्ष गोयंका; म्हणाले, “अशा गोष्टींमुळे…”

जगभरात या झूम कॉलची चर्चा असून याच कॉलमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं. ही संख्या एकूण कर्मचारी संख्येच्या १५ टक्के आहे.

harsh goenka vishal garg
ट्विटरवरुन या प्रकरणासंदर्भात व्यक्त केलं मत

अमेरिकेतील बेटर डॉट कॉम ही कंपनी सध्या जगभरामध्ये चर्चेत आहे. मात्र ही चर्चा सकारात्मक कारणासाठी नसून कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे चर्चेत आहे. न्यूयॉर्कमधील या कंपनीत काम करणाऱ्या ९०० कर्मचाऱ्यांना कंपनीचे मालक असणाऱ्या गर्ग यांनी तीन मिनिटांच्या झूम कॉलमध्येच नोकरीवरुन कमी करत असल्याचं सांगितलं. या झूम मिटींगचा व्हिडीओ सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. गर्ग यांनी मागील बुधवारी कर्मचाऱ्यांसोबत झूम कॉल केला होता. याच बैठकीत गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. हा आकडा कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या १५ टक्के आहे. या बातमीनंतर जगभरातून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतानाच प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनीही या प्रकरणावरुन आपला संताप व्यक्त केलाय.

नक्की पाहा हे फोटो >> तीन मिनिटांच्या Zoom Call मध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या भारतीय वंशाच्या सीईओची संपत्ती किती माहितीय का?

घडलं काय?
गर्ग हे भारतीय वंशाचे असल्याचे या बातमीची भारतामध्येही चांगलीच चर्चा रंगलीय. जगभरामध्ये विशाल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. अमेरिकेसहीत जगभरामधील अनेक देशांमध्ये सुट्ट्यांचा कालावधी सुरु होतोय. त्यापूर्वीच कंपनीने कॉस्ट कटींगचा विचार करुन मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केलीय. कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे याची कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना देण्यात आली नव्हती. बेटर डॉट कॉमची गुंतवणूक जपानमधील सॉफ्ट बँकेमध्ये आहे. या कंपनीचं एकूण मूल्य हे ७ अब्ज डॉलर इतकं आहे.

नक्की वाचा >> जॉब स्वीच करणं महागात पडणार! …तर नोकरी सोडताना संपूर्ण पगारावर भरावा लागणार १८ टक्के जीएसटी

गर्ग आहेत तरी कोण?
विशाल गर्ग हे बेटर डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ही एक डिजिटल फर्स्ट होम ओनरशिप कंपनी आहे. लिंक्टइनवरील माहितीनुसार गर्ग हे वन झीरो कॅपिटल या कंपनीचे संस्थापक भागीदारही आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला गर्ग यांनी न्यूयॉर्क शहरामधील सार्वजनिक शाळेतील विद्यार्थ्यांना करोना कालावधीमध्ये अडथळ्याविना अभ्यास करता यावा यासाठी दोन मिलियन डॉलर्स दान केले होते. गर्ग यांनी दान केलेल्या पैशांमधून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना आयपॅड आणि इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी करण्यात आलेला.

नक्की वाचा >> पगारावर १८ टक्के GST: “सरकारच्या तिजोरीत भर पडली पाहिजे हे खरे, पण त्यासाठी…”; शिवसेनेनं केंद्रावर साधला निशाणा

झूम कॉलवरुन कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढताना गर्ग काय म्हणाले?
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने केवळ तीन मिनिटांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पिंक स्लिप दिली. ‘मार्केट बदललं आहे. आपल्याला संघर्ष करत राहयला हवं. त्यामुळेच हा निर्णय स्वीकारुन तुम्ही पुढे वाटचाल करावी,’ असं गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं. कर्मचाऱ्यांचे कंपनीमध्ये फारसं योगदान नाहीय असं गर्ग यांनी आधी सांगितलं. त्यानंतर वर्किंग अवर्स म्हणजेच कामाच्या तासांसंदर्भात आपला आक्षेप व्यक्त करताना तुम्ही केवळ दोन तास काम करता, असंही गर्ग म्हणाले. गर्ग यांनी पुढे बोलताना हा कॉल झाल्यानंतर तुम्हाला एचआरकडून कामावरुन काढून टाकल्याचा ईमेल येईल, अशी माहिती दिली.

नक्की पाहा >> Video: Wipro मधील IT श्रेत्रातील नोकरी सोडली अन्…; कोल्हापुरी चपलांच्या परंपरेसाठी धडपडणारा मुंबईकर

गोयंका काय म्हणाले?
“झूम कॉलवरुन विशाल गर्ग यांनी ज्या ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटत आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे त्यांनी प्रत्येकाला समोर बसवून, प्रत्यक्षात समोरासमोर भेटून सांगायला हवं होतं. तसेच हे नाताळाच्या आधी आणि ७५० मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी मिळालेला असताना करायला नको होतं,” असं प्रांजळ मत गोयंका यांनी या कॉलचा व्हायरल व्हिडीओ ट्विट करत म्हटलंय. तसेच पुढे बोलताना त्यांनी सौम्य शब्दामध्ये आपला संताप व्यक्त करत, “या अशा गोष्टींमुळे कॉर्परेट क्षेत्राला हार्टलेस (भावनिक विचार न करणारे) असा टॅग मिळतो,” असं म्हटलंय.

२०२० मध्येही गर्ग यांनी कर्मचाऱ्यांवर ते आळशी असल्याचा आरोप केल्याचं वृत्त फोर्ब्सने दिलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Harsh goenka calls better dot com ceo vishal garg heartless for firing 900 employees on zoom call scsg

ताज्या बातम्या