अघोरी व अनिष्ट प्रथा जोपासण्यासाठी मुक्या प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा खूप आधीपासून चालत आलेली आहे. ग्रामीण भागात आजही अनेक लोक काही नवस फेडण्याच्या नावाखाली अनेक प्राण्यांचा बळी देतात. प्राण्यांचा बळी देण्याच्या नावाखाली प्राण्यांवर अत्याचार केल्याची अनेक प्रकरणे पाहायला मिळातात. सध्या असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आले आहे. येथील एक व्यक्ती बिनधास्तपणे भररस्त्यावर सर्वांसमोर एका प्राण्याच्या पिल्लाचा बळी देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत एक महिला पशुबळी देण्याऱ्या व्यक्तीला मुक्या प्राण्याचा जीव घेऊ नका असं सांगताना दिसत आहे. पण तो व्यक्ती तिच्याकडे दुर्लक्ष करतोच शिवाय धमकी देतानाही दिसत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला पुरुषाला पशुबळीचा विधी थांबवण्याचे आवाहन करताना दिसत आहे. व्हिडीओतील व्यक्तीने एका प्राण्याच्या निष्पाप पिल्लाला हातात धरल्याचं दिसत आहे. त्याच्या शेजारी बसलेला त्याचा सहकारी पशुबळी देण्याच्या विधीची तयारी करताना दिसत आहे. यावेळी एक महिला या दोघांना त्या पिल्लाला सोडून द्यायला सांगते, तेव्हा ते पिल्लाला सोडायला स्पष्टपणे नकार देतात. आपली चूक मान्य करण्याऐवजी यातील एक पुरुष त्या महिलेशी हुज्जत घालायला सुरुवात करतो.




हेही पाहा- रील बनवण्याच्या नादात गमावला जीव; भरधाव रेल्वेने दिली धडक, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
व्हिडिओमध्ये महिला म्हणते, “मी पोलिसांना बोलवू का?. तुम्ही याला (प्राण्याला) सोडून द्या.” त्यावर उत्तर देताना ती व्यक्ती म्हणते, “पोलिसांना बोलवा नाही तर इन्स्पेक्टरला बोलवा. इथे उभे राहून माझ्याशी वाद घालू नका.” महिलेने अनेकवेळा प्राण्याला सोडण्याचे आवाहन केलं तरीही तो व्यक्ती महिलेला वाद घालू नका आणि येथून निघून जा असं सांगतो. महिला पुढे म्हणते, “तुम्ही कोणाच्या मुलाला मारून कशी पूजा कशी करू शकता? तो मरेल. तुम्ही स्वतःच्या मुलाला माराल का? नाही ना? मग तुम्ही दुसऱ्याच्या मुलाला कसे मारू शकता.?” महिलेने असे विचारताच तो पुरुष काही वेळ तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो.
व्हिडीओत पुढे महिला त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारते. यावेळी त्याचे नाव ललित वर्मा असं सांगतो. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा आसपास अनेक लोक उपस्थित होते, मात्र कोणीही पुढे येऊन त्या व्यक्तीला असं अघोरी कृत्य करण्यापासून थांबवण्याचा किंवा महिलेला पाठिंबाही देण्याचा प्रयत्न कोणी केला नसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करुण योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.