Teacher Farewell Video: गुरू म्हणजे केवळ शिकवणारा नसतो, तर आयुष्य घडवणारा असतो. योग्य-अयोग्य यातील फरक समजावणारा, अडचणीच्या वाटेवर मार्ग दाखवणारा आणि एका व्यक्तीला उत्तम नागरिक बनविणारा खरा शिल्पकार म्हणजे शिक्षक. विद्यार्थ्यांचं आयुष्य आकार घेण्यामागे ज्या व्यक्तीचा सर्वांत मोठा वाटा असतो, ती म्हणजे गुरू. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं केवळ वर्गापुरतं मर्यादित राहत नाही, ते मनापर्यंत पोहोचलेलं असतं. अशाच एका नात्याचा भावूक प्रसंग सध्या चर्चेत आहे, ज्यानं अनेकांच्या मनाचा ठाव घेतलाय.
एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं केवळ शिकवणं आणि शिकणं इतकंच नसतं, ते असतं प्रेमाचं, विश्वासाचं आणि आयुष्य घडवण्याचं. सध्या सोशल मीडियावर असाच एक भावूक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलंय. बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील आदर्श मध्य विद्यालयात शिक्षिका म्हणून २२ वर्ष सेवा दिलेल्या रेखामॅडम यांचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.
अख्खं गाव आलं निरोप द्यायला…
रेखामॅडम यांचं नुकतंच दुसऱ्या शाळेत बदलीवर जाणं निश्चित झालं आणि ही बातमी गावात पसरली. तसा सगळा गावच शाळेकडे धावला. विद्यार्थी, पालक, शाळेतील इतर शिक्षक, महिला, वृद्ध सगळ्यांनी रडत-रडत निरोप दिला. इतकंच नव्हे, तर या निरोप सोहळ्यात बरेच लोक त्यांना मिठी मारून थांबत नव्हते, काहींनी तर भावूक होऊन अश्रू अनावर होत त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षणाचं बीज रोवणारी शिक्षिका
रेखामॅडम यांनी केवळ पुस्तकातील शिक्षण दिलं नाही, तर गावातही शिक्षणाविषयीची जागरूकता निर्माण केली. मुलींचं शिक्षण, शिस्त, नीतीमूल्यं याबाबत त्यांचं योगदान अमूल्य होतं. २२ वर्षांतील प्रत्येक पिढीवर त्यांचा ठसा आहे. म्हणूनच या भावनिक निरोपानं सोशल मीडियावर साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
व्हायरल व्हिडीओनं अंतःकरण हलवलं
या व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुलं हातात पोस्टर घेऊन उभी आहेत. ‘मॅडम, आम्हाला तुमची खूप आठवण येईल’, असं त्यावर लिहिलं आहे. बरेच जण त्यांना गिफ्ट देताना, त्यांच्या आठवणी सांगताना भावनाविवश झाले आहेत. स्वतः रेखामॅडमनाही त्या क्षणी भरून आलं आणि त्या फूट फुटून रडल्या.
येथे पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करीत लिहिलं, “देशाला अशाच समर्पित शिक्षकांची गरज आहे”, “हे नातं शब्दात नाही, अनुभवात उमटतं”, “रेखामॅडम, तुम्ही खरं शिक्षण दिलंत.” हा भावनिक क्षण तुम्ही पाहिलात का? अशा शिक्षकांच्या योगदानाला सलाम करायला विसरू नका. हा व्हिडीओ पाहून तुमचं मनही गहिवरेल.