Varanasi viral video: संगीत ही अशी गोष्ट आहे की, तिच्यापुढे भाषा, देश व संस्कृती या सगळ्या मर्यादा नाहीशा होतात. सूर, ताल व लय यांचा मिलाफ साधला गेल्यावर माणसाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. कधी कधी अगदी अनोळखी माणसांमध्येही संगीतामुळे एक अनोखा नातेसंबंध तयार होतो. अशाच एका सुंदर प्रसंगाचा अनुभव वाराणसीच्या घाटावर आला, जिथे एका ब्राझिलियन गिटारिस्टसोबत भारतीय ज्येष्ठ नागरिकाच्या स्वाभाविक नृत्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही तासांतच लाखो लोकांची मनं जिंकून गेला.

हा व्हिडीओ ब्राझीलचा संगीतकार लुकास एल्लर याने वाराणसीच्या घाटावर बसून आपल्या विद्यार्थ्यांसाठी गिटार शिकविण्याचे चित्रीकरण करताना शूट केला. तो शांतपणे गिटारचे वाजवतानाचे गाणे रेकॉर्ड करीत असताना अचानक त्याच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये एक भारतीय ज्येष्ठ नागरिक येतो. अनपेक्षितरीत्या फ्रेममध्ये आलेल्या त्या व्यक्तीकडे पाहून तो नाराज न होता, उलट हसून त्यांना जवळ येण्याचा इशारा करतो.

ज्येष्ठ माणूस एल्लरच्या जवळ येताच गिटारच्या तालावर सहजच थिरकू लागतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हसू, हलक्याशा नृत्याच्या स्टेप्स आणि त्या दोघांमधील सहज निर्माण झालेली ऊर्जा हे सगळं पाहणाऱ्याला भारून टाकतं. कोणतीही भाषा नसताना फक्त संगीतामुळे तयार झालेलं हे नातं इतक्या सुंदर रीतीनं फुलतं की, गिटार वाजवणारा त्या व्यक्तीचं कौतुक करतो आणि शेवटी “धन्यवाद” म्हणत त्यांचे आभार मानतो.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओच्या शेवटी एल्लरनं एक ओळ लिहिली आहे- “संगीत आणि प्रेम या खऱ्या अर्थानं सर्वांच्या भाषा आहेत.” हा छोटासा, परंतु हृदयाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला आतापर्यंत १.१ दशलक्षापेक्षा जास्त व्ह्युज मिळाले असून, हजारो लोकांनी प्रतिक्रियांमध्ये या क्षणाचा आनंद व्यक्त केला आहे.

एका युजरनं लिहिलं, “अचानक हा व्हिडीओ पाहिला आणि मन अगदी प्रसन्न झालं. किती सुंदर क्षण आहे.” दुसऱ्यानं लिहिलं, “इतक्या प्लॅन केलेल्या ‘कँडिड’ व्हिडीओंपेक्षा हा खरा आणि मनापासून आलेला क्षण जास्त सुंदर आहे.” एकानं प्रतिक्रिया देत लिहिलं, “मला भाषेची काहीही समज नाही; पण संगीत कधीही भाषा विचारत नाही. हाच पुरावा.”

तर आणखी एकानं म्हटलं, “तू गिटार घेऊन बसलास, शिकवण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्ड करीत होतास… आणि जादू आपोआप घडली.” सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इंस्टाग्राम ommmlucas अकाउंटवरून शेअर करण्यात आला असुन, लुकास एल्लरनं नुकताच एक दुसरा व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यात तो वाराणसीतल्या विद्यार्थ्यांना योग, संगीत, आवाज व खेळ यांचं मिश्रण वापरून शिकवत आहे.