नैसर्गिक आपत्ती ही कधी कोणाला सांगून येत नाही; मात्र कित्येकदा ती आल्यानंतर अनेकांचे संसार, स्वप्ने पार उद्ध्वस्त करून जाते. त्यात मुसळधार पाऊस, पूर यांसारख्या नैसर्गिक संकटांत अनेक निष्पाप जीवांना प्राण गमवावे लागतात. अनेकांची जिवाभावाची माणसं दुरावतात. आपली माणसं पुन्हा भेटतील की नाही, ती जिवंत असतील का असे अनेक प्रश्न मनातही वादळाप्रमाणे घोंघावत असतात. भीषण पूरस्थितीनंतरची परिस्थिती पाहताना मन हेलावून जाते. अशाच एका भीषण पूरस्थितीतील एक काळजाला भिडणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात विनाशकारी पुरात हरवलेल्या आपल्या श्वानाला पाहताच महिला धाय मोकलून रडताना दिसतेय. अतिशय भावनिक असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ ब्राझीलमधील असल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण ब्राझीलच्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यात नुकताच विनाशकारी पूर आला होता; ज्यामुळे शेकडो शहरे आणि गावे पाण्याखाली गेली. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते. या पुरात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

उन्हाळ्यात १० रुपयांची लोकल ब्रँडची आइस्क्रीम आवडीने खाणाऱ्यांनो फॅक्टरीतील ‘हा’ VIDEO पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा विचार कराल

विनाशकारी पूरस्थितीत मुक्या प्राण्यांची बिकट स्थिती

या पूरस्थितीतून लोकांचे जीव कसेबसे वाचले जात होते; मात्र मुक्या जनावरांची अवस्था फार बिकट झाली होती. परिणामी त्यांना वाचवणे अवघड काम होते. पण, माणुसकीचे एक उदाहरण या व्हिडीओतून पाहायला मिळाले. पूरग्रस्त ठिकाणाहून बाहेर पडताना महिलेने तिच्या हरवलेल्या श्वानाला पाहिले; ज्याला पाहून ती इतकी भावूक झाली की, ती सर्वांसमोर धाय मोकलून रडू लागली.

श्वानाला पाहून ढसाढसा रडू लागली महिला

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पूरग्रस्त ठिकाणाहून बचाव पथक काही लोकांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होते. यावेळी बोटीमध्ये बसलेल्या एका महिलेला पुरात हरवलेला तिचा श्वास दिसतो; ज्याला पाहून ती खूप आनंदी होते. आपले पोटचे हरवलेले लेकरू पुन्हा भेटल्यावर जसा आनंद होतो, तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या श्वानाला पाहताच ती ढसाढसा रडू लागते. त्यानंतर बचाव पथकातील एक अधिकारी श्वानाला बोटीत घेतो. त्यानंतर ती श्वानाला जवळ घेत गोंजारते, मिठी मारून प्रेम व्यक्त करून आनंदाने रडू लागते.

हा अतिशय भावनिक असा व्हिडीओ @GoodNewsMVT या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्युज मिळाले आहेत; तर अनेकांनी कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.