गंगा नदीच्या घाटावर एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये ही घटना घडली आहे. पर्यटक महिला गंगा घाटावर बसून दारु पित होती. त्यावेळी तिला पोलिसांनी असं करु नकोस म्हणून रोखलं. ज्यानंतर ही महिला चांगलीच चिडली आणि पोलिसांशी हुज्जत घालू लागली. त्यांना शिव्याही दिल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेवटी या महिलेचा नवरा आला आणि तिला घेऊन गेला.

पोलिसांनी काय सांगितलं?

ऋषिकेश या ठिकाणी गंगा नदीच्या घाटांवर फिरण्यासाठी आलेली एक महिला तिथे दारु पित बसल्याचा एक व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ पोलिसांनीही पाहिला. ज्यानंतर या महिलेला त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी समजावलं आणि गंगा घाटावर दारु पिऊ नकोस असं सांगितलं. त्यावर ही महिला चांगलीच चिडली आणि पोलिसांशी भांडण करु लागली, वाद घालू लागली. पोलिसांनी जेव्हा या तरुणीला रोखलं तेव्हा ती पोलिसांवरच जोरजोरात ओरडू लागली. ही घटना ६ एप्रिलला घडली. फूल छत्ती भागात ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

तरुणी काय ओरडत होती? व्हायरल व्हिडीओत काय?

आमच्यासारखे पर्यटक येतात म्हणून तुम्हाला रोज जेवण मिळतं. आम्हालाच तुम्ही रोखत आहात का? मी दारु पित असले तरीही माझ्या पैशांनी दारु पिते आहे. तुम्ही मला रोखणारे कोण? आता हे आमच्यावर फ्रॉड केसेस दाखल करत आहेत. ही तरुणी पोलिसांचा व्हिडीओ तयार करताना आणि त्यांच्याशी वाद घालताना दिसते आहे. मी दारु प्यायले पण मी कुणाशी काय वाद घातला का? मी कुणाला काही बोलले का? असे प्रश्न या महिलेने विचारले आहेत. तसंच ती शिव्याही देताना दिसते आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Ghar Ke Kalesh या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

ऋषिकेश मध्ये ही घटना घडली, व्हिडीओ व्हायरल

ऋषिकेश मधल्या ज्या भागात ही घटना घडली तो भाग अध्यात्मिक भाग म्हणून तयार करण्यात आला आहे. या भागात कुणीही मांसाहार करत नाही, तशी हॉटेल्सही तिथे नाहीत. तसंच कुणीही मद्यपान करत नाही. हीच बाब पोलीस या पर्यटक महिलेला समाजावून सांगत होते. पण तिने कुणाचंही ऐकून घेतलं नाही. या ठिकाणी काही चुकीची गोष्ट घडत नाही ना? हे पाहिलं जात असतं. पोलिसांना आढळून आलं की ही तरुणी मद्यपान करते आहे. त्यानंतर तिला अडवण्यात आलं. मात्र उलट या तरुणीनेच पोलिसांना शिवीगाळ केली. शेवटी तिच्या नवऱ्याला पोलिसांनी सांगितलं की तू तिला चार गोष्टी समजाव. ज्यानंतर तिचा नवरा तिला इथून घेऊन गेला.