माणुसकी हाच खरा माणसांचा धर्म आहे. प्रत्येक माणसाने इतरांबरोबर प्रेमाने, आदराने आणि करुणेने वागणे. ही माणुसकी माणसांमधून हरवत चालली आहे. पण अजूनही काही मोजके लोक असे आहे जे माणुसकी जिवंत ठेवतात. संकटात सापडलेल्या प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात. सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा माणसांना सहन होत नाहीये तर मुक्या प्राण्यांची अवस्था तर त्याहून बिकट आह. तहालेले प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरताना दिसतात अशावेळी त्यांना हुसाकवून लावण्याऐवजी त्यांना पाणी पाजून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवणारी एक हृदयस्पर्शी घटना महाराष्ट्रात घडली आहे.

माणसांबरोबरच प्राण्यांनाही पाण्याची गरज किती तीव्र असते, हे अधोरेखित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या घटनेत बसमधील प्रवाशांनी तहानलेल्या माकडांना पाणी देऊन संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले.

ही घटना २१ मे रोजी दुपारच्या सुमारास खंडाळा घाट परिसरात घडली. वाशिम–पुसद मार्गावर धावणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस (MSRTC) घाट भागात पोहोचली असताना अचानक रस्त्यावर एक माकड आले आणि बससमोर उभे राहिले. चालकाने बस थांबवली, मात्र माकड जागेवरून हलायला तयार नव्हते.

प्रवासी आणि चालकाने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळातच परिस्थितीचा अर्थ लक्षात आला. त्या माकडाची अवस्था उष्णतेमुळे अत्यंत थकलेली आणि तहानलेली असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर एका प्रवाशाने बाटलीतील पाणी त्या माकडाला दिले. माकडाने पाणी पिताच परिसरात असलेल्या इतर माकडांनीही जवळ येत गाडीभोवती गर्दी केली.

काही क्षणांतच प्रवाशांनी स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या बाहेर काढून या प्राण्यांना पाणी देण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण लता श्रीवास या प्रवाशाने मोबाईलवर केले असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

ही घटना फक्त भावनिकच नाही तर पर्यावरणीय वास्तवही अधोरेखित करणारी आहे. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट कायम असून जंगलभाग आणि घाट परिसरातील प्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता मोठी समस्या बनली आहे. वन विभागाकडून अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी वन विभागाला जंगल मार्ग आणि प्राणी अधिवास क्षेत्रांमध्ये पाण्याच्या स्रोतांचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे.खंडाळा घाटातील हा प्रसंग माणूस आणि निसर्गातील सहजीवनाची आठवण करून देणारा ठरला आहे.