रस्त्यावर चालताना गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याच्या घटना तुम्ही ऐकून असाल किंवा प्रत्यक्षात पाहिल्याही असाल. पण, चोरीच्या घटनेचा असा एक नवा व्हिडीओ सध्या समोर आला आहे; जो पाहून सर्वांनाच धक्का बसेल. कारण- व्हिडीओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोर हॉटेलमध्ये घुसून खूप वेळ महिलेच्या गळ्यातील चेनकडे पाहत होता. यावेळी त्याने संधी मिळताच तिच्या गळ्यावर हात टाकला आणि चेन चोरून पसार झाला. ही घटना रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरियाणातील पानिपत येथील तहसील कॅम्प रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. रेस्टॉरंटसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणीही अशी घटना घडताना पाहून लोक हैराण झाले. व्हिडीओमध्ये हेल्मेट घातलेली एक जण महिलेच्या टेबलाजवळ उभा आहे. तो फूड ऑर्डर घेण्याचा आव आणतो; पण प्रत्यक्षात तो सोनसाखळी चोर आहे.

चोरट्याने चेन हिसकावून काढला पळ

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, चोर थोडा वेळ तिथे उभा राहतो आणि महिलेच्या गळ्यातील चेन पाहतो. त्यानंतर संधी दिसताच तो महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळून जातो. हे सर्व इतके अचानक घडते की, त्या महिलेला आणि आजूबाजूच्या लोकांनाही काहीच समजत नाही. इतक्यात रेस्टॉरंटचा एक कर्मचारी किचनमधून बाहेर येतो आणि चोराला पकडण्याचा प्रयत्न करतो. गोंधळ होताच रेस्टॉरंटमधील कर्मचारी एकापाठोपाठ अशा प्रकारे बाहेर धावत येतात; पण चोर तितक्यात चोरी करून पसार झालेला असतो.

पाऊस आला ढिंच्यांग ढिंच्याक! भररस्त्यात आनंदाने उड्या मारत नाचू लागला उंदीर; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना ८ जून रोजी दुपारी ३.४० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ खूप शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत तो तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आणि त्यांनी कमेंटमध्ये सोन्याचे दागिने अशा प्रकारे चोरीला जाण्याच्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “जर कोणी हेल्मेट घालून रेस्टॉरंटमध्ये येत असेल, तर सावध राहा.”

पण, सोनसाखळीचोरीची ही एकमेव घटना नाही. मे महिन्यातही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यामध्ये एकाने एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला आणि दोन वृद्ध लोकांना बोलण्यात व्यग्र असल्याचे पाहिले. त्यानंतर चोर गुपचूप त्याच्या शेजारच्या सीटवर बसतो आणि त्याच्या खिशातून मोबाईल काढतो. ही चोरी केल्यावर तो लगेच रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो.