काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. विमानात चक्क भिकारी चढल्याचं या व्हिडिओत दिसत होतं. हे प्रकरण इथवरच थांबलं नव्हतं तर विमानातल्या प्रत्येक प्रवाशाकडे तो भीक मागत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानची सोशल मीडियावर खूपच खिल्ली उडवली गेली.

पाकिस्तान फिल्म सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष डॅनिअल गिलानी यांनी संबधित व्यक्ती भिकारी नसून प्रवासी असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडिओ कराची बँकॉक विमानातला नसून तो डोहा-शिराज विमानात चित्रित केल्याचं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे. विमानातील एका  महिलेनं तो तयार केल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे. प्रवाशांकडे पैसे मागणारा व्यक्ती हा भिकारी नसून तो इराणी प्रवासी असल्याचं गिलानी यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे.

त्याला इराणला जायचं होतं. मात्र प्रवासात त्याच्याजवळ पैसे नसल्यानं तो इतर प्रवाशांकडे पैसे मागत असल्याचा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. पण, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गिलानी यांचा दावा खोडून काढला आहे.