High-Voltage Drama at Marine Drive : मायानगरी मुंबईतील अतिशय गजबजलेल्या आणि व्हीआयपी मार्ग मानल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) आज एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भरदिवसा आणि भररस्त्यात एका नागरिकाने थेट ऑन-ड्यूटी पोलिसांशीच हुज्जत घालत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर इंटरनेटवर संतापाची लाट पसरली असून “तो कुणीही असो, त्याला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे!” अशी जोरदार मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

नेमकं काय घडलं मरीन ड्राईव्हवर?(What Exactly Happened at Marine Drive?)

X (ट्विटर) वर वेगाने शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट आणि ट्राऊझर घातलेला, पायात चप्पलही नसलेला एक तरुण रस्त्याच्या मध्यभागी पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. आजूबाजूला गाड्या आणि बेस्ट बसची ये-जा सुरू असताना हा व्यक्ती अत्यंत आक्रमकपणे एका पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने चालून जातो आणि त्यांच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न करतो.

तोच बाजूला असलेले इतर दोन पोलीस कर्मचारी तातडीने मध्यस्थी करतात. एक पोलीस कर्मचारी त्याला घट्ट पकडून ठेवतो, तर दुसरा अधिकारी त्याला इशारा देऊन आवरण्याचा प्रयत्न करतो. तर तिसऱ्या कर्मचाऱ्याच्या हातात काठी दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मरीन ड्राईव्हवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

ट्रॅफिक नियमांवरून वाद (Traffic Rules Argument )

सोशल मीडियावर फिरणाऱ्या दुसऱ्या एका माहितीनुसार, हा व्यक्ती एक कार चालक होता. ट्रॅफिक पोलिसांनी त्याला वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगितल्याने त्याचा पारा चढला. या क्षुल्लक कारणावरून त्याने ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातली आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच ताब्यात घेण्यात आले.

जरी हा व्हिडिओ आज सकाळचा असल्याचा दावा केला जात असला, तरी या व्हिडिओची सत्यता आणि घटनेची वेळ अजून अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. तसेच संबंधित व्यक्तीची ओळखही अद्याप पटू शकलेली नाही.

‘त्याला धडा शिकवाच!’ नेटकऱ्यांचा मुंबई पोलिसांकडे तगादा (Netizens Demand Strict Action Against the Accused)

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मुंबईकरांचा आणि नेटकऱ्यांचा पारा चांगलाच वाढला आहे.

“खाकीचा धाक उरलाय की नाही?” असा सवाल करत एका युजरने मुंबई पोलिसांना टॅग करून विचारले, “भरदिवसा एक सामान्य नागरिक पोलिसांवर हात उगारण्याची हिंमत कशी करू शकतो?”

“तो कुणीही असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी दुसऱ्या युजरने केली.

काही युजर्सने पोलिसांच्या संयमावर प्रश्न उपस्थित करत “अशा लोकांना पोलीस तात्काळ ताब्यात का घेत नाहीत?” असा सवाल केला, तर काहींनी हा व्हिडिओ एडिटेड किंवा स्टॅण्ड-अप स्टंट आहे का, असा संशयही व्यक्त केला.

मुंबई पोलिसांच्या अधिकृत प्रतिक्रियेची प्रतीक्षा (Awaiting Official Statement from Mumbai Police)

या संपूर्ण हायव्होल्टेज ड्राम्यावर मुंबई पोलीस दलाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे की नाही आणि त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे का, याबद्दलची माहिती मिळणे बाकी आहे.