जगभरातील वाढत्या स्मार्टफोन वापरासोबत लोकांमध्ये चिन्हांची भाषा प्रिय होत असल्याचे दिसून येते. ‘स्माइली’च्या चिन्हाने लोकप्रिय झालेल्या भाषेत आजची पिढी व्यक्त होत आहे. आपापल्या फोनवरून दुसऱ्याच्या फोनवर इमोजीच्या भाषेतून बोलण्याची जणू क्रेझच पाहायला मिळते. स्माइलीसोबत इतर अनेक चिन्हामध्ये (इमोजी) आता आणखी भर पडणार आहे. लवकरच स्मार्टफोनमध्ये स्तनपान करविणारी महिला,  हिजामधील महिला आणि योगा करणाऱ्या पुरषाच्या इमोजीला स्थान मिळणार आहे.

इमोजीच्या बाबतीत निर्णय घेणाऱ्या इंग्लंडमधील संस्थेने नव्या स्मार्टफोनमध्ये आणखी भर घालण्याचा विचार केला आहे. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, आगामी नवीन वर्षात स्मार्टफोनमध्ये आणखीन ५१ नवीन इमोजी उपलब्ध होणार आहेत. या नवीन इमोजीचा समावेश झाल्यानंतर स्मार्टफोनमधील इमोजीचा आकडा १७२४ च्या घरात पोहचेल. स्मार्टफोनमधील कार्टूनच्या स्वरुपात वापरण्यात येणाऱ्या छोट्या चित्रांना इमोजी असे संबोधले जाते. संदेश पाठविण्यासाठी शब्दांचा कमीत कमी वापर करणारी मंडळी या चित्रांचा उपयोग सर्रास करताना दिसते.

दु:ख, उदासीनता, नैराश्य, गळून जाण, अश्रुपात, वाईट वाटणे, मनाला लागणे या निरनिराळ्या अर्थच्छटांसाठी एकच ‘सॅड’चं सिम्बॉल आता पुरते आहे. ‘मी प्रेम करतो’ एवढे तीन शब्दही न वापरता ‘हार्ट’ किंवा ‘किस’चं चिन्ह आता वापरता येते आणि कशाचेही कौतुक करताना वेळ आणि शब्दांची कमाल बचत करीत लोक उंचावलेल्या अंगठय़ाचे ‘लाइक’चे चिन्ह पाठवीत आहेत. ही चिन्हे अर्थात इमोजी भाषेमधील शब्दांचा संकोच करीत आहेत का? या चिन्हांमुळे जगभरच्या भाषा संकटात येतील का? की उलट या चिन्हांमुळे भाषेला पूरक असे अभिव्यक्त होण्याचे नवे साधन मिळेल? असे अनेक अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी ही भाषा आजच्या घडीला लोकप्रिय आहे हे नाकारता येणार नाही.