Hiker Dies In 500-Foot Fall Moments After Posing for Photo: आजकाल सोशल मीडियावर भन्नाट फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्याचे अनेकांना वेड लागले आहे. वेगळा फोटो मिळावा म्हणून अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालून उंच कडे, डोंगर किंवा दरीच्या टोकावर जाऊन पोझ देतात. मात्र, अशाच एका क्षणिक मोहाने एका व्यक्तीचा जीव गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय एक व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांसोबत डोंगरावर ट्रेकसाठी गेली होती. डोंगराच्या माथ्यावर असलेल्या एका उघड्या खडकावर उभे राहून त्या व्यक्तीने सुंदर दृश्याच्या पार्श्वभूमीवर काही छायाचित्रे काढली. हा खडक अतिशय धोकादायक असल्याची माहिती असूनही अनेक पर्यटक तिथे फोटो काढण्यासाठी जात असल्याचे सांगितले जाते.
फोटो काढून झाल्यानंतर तो खाली उतरण्यास निघाला. त्याच वेळी त्याच्यासोबत असलेली एक व्यक्ती संपूर्ण प्रसंग मोबाईलमध्ये चित्रित करत होती. व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. ती त्याला सावध राहण्याचा इशारा देत होती. मात्र, काही क्षणांतच त्याचा तोल गेला आणि पुढे जे घडलं ते पाहून उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला.
पाय घसरताच तो थेट सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या लोकांच्या किंकाळ्या आणि गोंधळही व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. हा प्रसंग इतका भीषण होता की, उपस्थितांना काही क्षण काय घडलं हेच समजलं नाही.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिसर अतिशय दुर्गम आणि दाट झाडांनी वेढलेला असल्याने बचावकार्य हे मोठे आव्हान ठरले. बचाव पथकाला दोरखंडांच्या मदतीने खाली उतरावे लागले. काही ठिकाणी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. जवळपास चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात यश आले,
मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर दुखापतींमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. संबंधित व्यक्ती ट्रेकिंग गटाला मार्गदर्शन करत होती, मात्र त्यासाठी आवश्यक अधिकृत परवाना त्याच्याकडे नव्हता. तसेच तो खडकावरून खाली उतरताना सुरक्षित मार्गाऐवजी अधिक धोकादायक बाजूने उतरण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याचा तोल गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा पर्यटकांना इशारा दिला आहे. आकर्षक फोटो किंवा व्हिडीओच्या नादात जीव धोक्यात घालू नका. डोंगर, कडे किंवा दरीच्या टोकावर जाऊन छायाचित्रे काढणे किती महागात पडू शकते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधीही या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक अपघात घडल्याची नोंद आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या भीषण घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, क्षणभराचा निष्काळजीपणा आयुष्य संपवू शकतो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
येथे पाहा व्हिडीओ
ही धक्कादायक घटना दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमधील रिओ डी जानेरोजवळील मरिका परिसरातील प्रसिद्ध ‘पेद्रा दो माकाको’ (Pedra do Macaco) ट्रेलवर रविवारी घडली. मृत व्यक्तीची ओळख ४४ वर्षीय कैओ रोचा अगुईआर अराबाल अशी झाली आहे.
