Family Uses Newlywed’s Dupatta To Rescue Biker On Flood Video : पुराची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भयावह होत आहे. नेपाळमधील जीवितहानीनंतर आता या महापुराचा फटका भारताच्या विविध भागांनाही बसत आहे. सध्या हिमाचल प्रदेशसारख्या पर्वतीय प्रदेशांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून लोक पुराच्या पाण्यातून मार्ग काढत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावरून बाईकने जात असताना एक तरुण पुराच्या पाण्यात अडकला, ज्यामुळे त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की त्याला बाहेर पडणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत एक नवविवाहित महिला त्याच्या मदतीसाठी धावून आली आणि तिने थेट ओढणीच्या साहाय्याने त्याचे प्राण वाचवले.

निखिल सैनी नावाच्या एका ‘एक्स’ (ट्विटर) युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला असून, ही घटना चंबा येथील भटियतमध्ये घडल्याचे त्याने सांगितले आहे. एक कुटुंब पुराच्या खवळलेल्या पाण्यातून कारने प्रवास करत होते. त्याच वेळी त्यांना पुराच्या पाण्यात एक बाईकस्वार अडकलेला दिसला, ज्याचे त्यांनी प्राण वाचवले.

व्हायरल व्हिडीओमध्ये पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाहताना दिसत आहे. या भयानक प्रवाहामुळे बाईकस्वार रस्त्याच्या एका बाजूला अडकला होता. त्याला पाहून या कुटुंबाने गाडी थांबवली. त्यानंतर एक तरुण वाहत्या पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ एक महिलाही खाली उतरली. हे दोघे नवविवाहित दाम्पत्य होते. त्यांनी अनेक दुपट्टे एकत्र बांधून एक लांब दोरी तयार केली. यानंतर महिलेने ती दोरी बाईकस्वाराच्या दिशेने फेकली आणि अखेर त्याला ती पकडता आली.

ओढणी पकडून बाईकस्वाराला सुरक्षितपणे गाडीपर्यंत आणण्यात आले. त्या तरुणाला वाचवण्यासाठी नवविवाहितेने केवळ गाडीत उभे न राहता थेट पुराच्या पाण्यात उतरून शौर्य दाखवले. अशा प्रकारे तो बाईकस्वार सुखरूप बाहेर आला, पण त्याची बाईक मात्र पाण्यातच अडकून राहिली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण या नवविवाहित जोडप्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने “माणुसकी अजूनही जिवंत आहे, यातच जीवनाचे सौंदर्य आहे,” अशी कमेंट केली. तर दुसऱ्या एका युजरने “तो तरुण स्वतःच्या जिवापेक्षा बाईकबद्दल जास्त चिंतित दिसत होता,” असे म्हणत त्याची चूक निदर्शनास आणून दिली.