सोन्याहून महाग ‘हिमालयीन व्हायग्रा’ नष्ट होण्याच्या मार्गावर

ही एकप्रकारची बुरशी असून ती सुरवंटाच्या शरीरातून उगवते. तिला ‘यासरगुंबा’ नावानंही ओळखलं जातं.

गेल्या काही वर्षांत वातावरणात मोठ बदल झाला आहे त्यामुळे 'यासरगुंबा' आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

‘हिमालयीन व्हायग्रा’ किंवा ‘यासरगुंबा’ म्हणून ओळखली जाणारी ही बुरशी जगातील सर्वात महागडी बुरशी आहे. या बुरशीसाठी आतापर्यंत चीन, नेपाळमधल्या स्थानिक लोकांमध्ये कित्येकदा भांडणं झालीत. काहींचे हकनाक बळी गेले. पण तरीही बुरशी मिळवून पैसे कमावण्याचे प्रयत्न मात्र कोणीही सोडले नाही. या बुरशीची किंमत सोन्याहूनही कैक पटींनी अधिक आहे. नेपाळ, भारत, भूतान आणि तिबेटमधल्या हिमालयीन डोंगररांगांमध्ये ती आढळते. मात्र आता ही बुरशी जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असं ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स’च्या संशोधनातून समोर आलं आहे. हवामानातील बदल हे प्रमुख कारण यामागे असल्याचं म्हटलं जात आहे.

ही बुरशी कॅन्सरवर परिणामकारक आहे. तिनं नपुसकता जाते तसेच इतरही आजारांवर ही संजवीनी आहे असं इथले लोक मानतात. अजूनही या दाव्याला वैज्ञानिक मान्यता मिळायची आहे. मात्र तरीही तिला मोठी मागणी आहे. गेल्या दशकभरात बिजिंगमध्ये सोन्याच्या भावापेक्षाही तिप्पट किंमत या बुरशीला मिळाली. स्थानिक लोक ‘यासरगुंबा’ म्हणून या बुरशीला ओळखतात. पाण्यात उकळवून किंवा सुप्स व अन्य पदार्थामध्ये टाकून ती खाल्ली जाते. असं केल्यानं सारे रोग बरे होतात असं इथली लोक मानतात.

‘यासरगुंबा’ म्हणजे काय?
‘यासरगुंबा’ ‘हिमालयीन व्हायग्रा’ म्हणूनही ओळखलं जातं. हिमालयाच्या डोंगरावर आढळणारी एक बुरशी सुरवंटाच्या शरीरात प्रवेश करते. हळहळू ती सुरंवाटाला नष्ट करते. मग एका ठराविक वातावरणात सुरवंटाच्या शरीरातून ही बुरशी उगवते. एका विशिष्ट तापमानाला आणि विशिष्ट मातीतच ती उगवते. यासाठी तापमान शून्य अंश सेल्शिअसच्या खाली असणं आवश्यक असतं. जमिनीचा जो पृष्ठभाग थंडीत गोठत नाही अशा ठिकाणी जवळपास साडेअकरा हजार फुट उंचीवर ती सुरवंटाच्या शरीरातून उगवते. ठराविक काळात नेपाळ, भारत, भूतान आणि तिबेटमधली स्थानिक लोक डोंगर चढून ‘यासरगुंबा’ गोळा करतात. ‘यासरगुंबा’ ला प्रचंड मागणी असल्यानं आणि चांगले पैसे तिला मिळत असल्यानं स्थानिक लोक आपला जीव धोक्यात घालून ती गोळा करतात. खूप ‘यासरगुंबा’ मिळाले तर लोकांना लाखो रुपये मिळतात.

‘यासरगुंबा’ का नष्ट होते?
लाखो रुपये किंमतीत विकली जाणारी ‘यासरगुंबा’ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही बुरशी गोळा तसेच विक्री करणाऱ्या जवळपास ८०० हून अधिक लोकांशी बोलून संशोधकांनी ती नष्ट होण्यामागचं काम जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांत वातावरणात मोठ बदल झाला आहे. ‘यासरगुंबा’ उगवण्यासाठी शून्य अंश सेल्शिअस हून कमी तापमानाची आवश्यकता आहे. मात्र या डोंगरभागात हिवाळ्यातील तापमान हे ३ अंश सेल्शिअसच्या आसपास असतं. त्यामुळे ‘यासरगुंबा’ उगवण्याचं प्रमाण कमी कमी होत आहे. तपमान वाढीचा फटका भूतान भागाला अधिक बसला आहे, इथल्या स्थानिकांना ‘यासरगुंबा’ नजरेस पडणं जवळपास अशक्य झालं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Himalayan viagra yarchagumba under threat from climate change

ताज्या बातम्या