विशिष्ट वयात नोकरी मिळत नसेल की अनेकांची अवस्था सैरभैर होते. त्यातही आपल्या बरोबरीचे सगळे जण नोकरी करत असतील आणि चांगले शिक्षण घेऊनही आपल्याला नोकरी मिळत नसेल तर काय करावे हे अनेकांना समजत नाही. पण एका तरुणाने मात्र एक शक्कल लढवली आणि त्याला एक दोन नाही तर नोकरीच्या चक्क २०० ऑफर्स आल्या. सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. असेच स्वप्न उराशी बाळगून २६ वर्षीय डेविड कासारेज हा तरुण याठिकाणी आला होता. डेविड हा वेब डेव्हलपर असून तो टेक्सास अॅग्रिकल्चर अँड मेकॅनिकल विद्यापीठातून पदवीधर झाला आहे.

नोकरी मिळविण्यासाठी डेविडने एक अजब मार्ग निवडला. आपला रिझ्युमे घेऊन तो एका ट्रॅफीक सिग्नलवर उभा राहीला. त्यावेळी त्याने आपल्या हातात एक पोस्टर घेतले होते. ज्यावर लिहीले होते, ”होमलेस, हंग्री फॉर सक्सेस, टेक अ रिझ्युमे” म्हणजेच बेघर आणि यशासाठी भुकेला, माझ्या रिझ्युमेचा स्विकार करा. हा तरुण एकप्रकारे नोकरीची भीक मागत असल्याचे दिसत आहे. डेविडची नोकरी मागण्याची ही पद्धत जस्मीन स्कोफिल्ड नावाच्या महिलेला खूप भावली. तिने या तरुणाला पाहिल्यावर त्याचा फोटो आणि रिझ्युमे दोन्हीही आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट केले. हे फार अद्भुत आहे, कोणी सिलिकॉन व्हॅलीतून असेल तर त्यांनी याला मदत करावी असे आवाहनही तिने यावेळी केले. त्यानंतर डेविडला नोकरी देण्यासाठी ट्विटरवर विशेष मोहम सुरु करण्यात आली. ‘गेट डेविड अ जॉब’ म्हणजेच डेविडला नोकरी द्या असा हॅशटॅग वापरण्यास सुरुवात केली गेली.

या आवाहनानंतर डेविडकडे नोकऱ्यांच्या प्रचंड ऑफर आल्या. गुगल आणि नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या कंपन्यांबरोबरच त्याला २०० कंपन्यांकडून ऑफर देण्यात आली. डेविड याआधी ऑस्टीन येथे नोकरी करत होता. मात्र कॅलिफोर्नियामध्ये नोकरीच्या चांगल्या संधी असतील यासाठी तो आला होता. मात्र नोकरी शोधण्यात त्याचे बरेच पैसे खर्च होत असल्याने शेवटी त्याने सिग्नलला उभे राहण्याचा पर्याय शोधला होता आणि त्यात तो यशस्वीही झाला. या टप्प्यावर त्याच्याकडचे सगळे पैसे संपल्याने तो भाड्याने घर घेऊ शकत नव्हता. अशावेळी त्याने आपल्या कारमध्येच राहण्याचा पर्याय स्विकारला होता.