Hostel Life Emotional Video Viral : घर सोडून होस्टेलमध्ये शिक्षणासाठी राहणं लहान मुलांसाठी फार अवघड काळ असतो. सुरुवातीला सर्व काही नवीन वाटते. नवीन शहर, नवीन शाळा, नवीन मित्र आणि पूर्णपणे वेगळे वातावरण. जवळ काही झालं तरी आई-बाबा नाही, बाहेरून पाहताना होस्टेल लाईफ फार मजेशीर वाटते. मित्रांसह राहणे, सगळ्या गोष्टी स्वत:च्या स्वत: करणे आणि नवीन गोष्टी शिकणं, हे ऐकायला नक्कीच भारी वाटतं. परंतु, दिवस सरताच रात्री घरच्यांची फार आठवण येते तेव्हा जाणीव होते की कुटुंबापासून दूर राहणे किती कठीण असते. सध्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, होस्टेलमधील अनेक लहान मुलं तेथील टेलिफोन बूथवर आपल्या पालकांशी फोनवर बोलताना दिसत आहेत. यावेळी एक मुलगा असंच आपल्या आईशी बोलताना अचानक त्याचे डोळे भरून आले. पण, कसंबसं त्यानं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की त्याला आईची, घरच्यांची खूपच आठवण येत आहे. यावेळी पाणावलेल्या डोळ्यांनी काही मुलं फोनवर घरच्यांचं बोलणं ऐकून घेताना दिसतायत.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलांच्या भावना काळजाला स्पर्श करणाऱ्या आहेत, कारण त्यामध्ये कोणताही खोटेपणा किंवा दिखाऊपणा नाही. हे अश्रू कोणत्याही कॅमेऱ्यासाठी नसून, आपल्या घराच्या आणि आईच्या आठवणीत आलेले आहेत. मुलांच्या चेहऱ्यावरील या खऱ्या भावना होस्टेलमध्ये राहिलेल्या किंवा शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीला जुन्या दिवसांची आठवण करून देत आहेत.
होस्टेलचे आयुष्य केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसते. येथे प्रत्येकाला स्वतःची कामं स्वत: करावी लागतात. सकाळी वेळेत उठणे, आपल्या वस्तूंची काळजी घेणे, अभ्यास आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळणे, हे सर्व त्यांना हळूहळू स्वावलंबी बनवते. हेच अनुभव पुढे जाऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व मजबूत करतात. मात्र, या प्रवासातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपल्या घरच्यांपासून दूर राहणे.
हा भावूक करणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @daywithaviip नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आता अनेक जण कमेंट्स करत आहेत. अनेकांचे मत आहे की, होस्टेलचे आयुष्य माणसाला मजबूत नक्कीच बनवते, पण कुटुंबाचे महत्त्व काय असते हे देखील शिकवते. जेव्हा आपण आपल्या माणसांपासून दूर राहतो, तेव्हाच त्यांच्या प्रेमाची, काळजीची आणि सोबतीची खरी किंमत कळते.
