“आम्हाला जेवण बनवण्यास मदत करा, आम्ही तुमचे पोट भरू,” अशा आशयाचा फलक सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असताना, होसूरमधील एका हॉटेलने या संकटाचे संधीत रूपांतर केले आहे.

नेमकी ऑफर काय आहे?

जो ग्राहक व्यावसायिक सिलेंडर देईल, त्याला महिनाभर दररोज मोफत बिर्याणी दिली जाईल. इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून व्यावसायिक गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. १ सिलेंडर देणाऱ्याला रोज १ प्लेट बिर्याणी, तर २ सिलेंडर देणाऱ्याला रोज २ प्लेट बिर्याणी महिनाभर मोफत मिळेल.

संकटातून सुचली नामी युक्ती

होसूरमधील ‘इरोड एमीज मेस’ (Erode Emmys Mess) हे हॉटेल सध्या गॅसच्या टंचाईमुळे त्रस्त आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून शेकडो हॉटेल्सना स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. यावर मात करण्यासाठी हॉटेल मालकाने ही ‘बदला पद्धत’ (Exchange Policy) सुरू केली आहे.

काही हॉटेल चालकांनी गॅसचा वाढता खर्च भागवण्यासाठी ग्राहकांच्या बिलावर अतिरिक्त ‘गॅस शुल्क’ लावण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी आपली हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवली आहेत. मात्र, इरोड एमीज मेसने ग्राहकांकडील अतिरिक्त किंवा न वापरलेले व्यावसायिक सिलेंडर मिळवून आपले स्वयंपाकघर सुरू ठेवण्याचा मार्ग निवडला आहे.

हा केवळ नफा कमावण्याचा उद्देश नसून कठीण काळात हॉटेल सुरू ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना सेव देत राहण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे, असे हॉटेल प्रशासनाने म्हटले आहे.

कायदेशीर अडचण आणि आव्हाने

वाढत्या किमतींमुळे अनेक ठिकाणी ग्राहकांच्या बिलात गॅससाठी वेगळे पैसे आकारले जात आहेत. मात्र, प्रशासनाच्या मते अशा प्रकारे वेगळे शुल्क आकारणे हे ‘ग्राहक संरक्षण कायद्या’चे उल्लंघन ठरू शकते. अशा परिस्थितीत होसूरमधील या हॉटेलने काढलेली तोडगा सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

ओडिशातील काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅस नसल्यामुळे कोळसा आणि लाकडाचा वापर सुरू केला आहे, तर महाराष्ट्रातील हॉटेल संघटनांनी सरकारकडे या प्रश्नी मदतीची मागणी केली आहे.