Chanakya Niti: प्रत्येक ऑफिसमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे मनापासून काम करतात आणि दुसरे ते जे अशा लोकांचा फायदा घेतात. पहिल्या प्रकारचे लोक मेहनती, प्रामाणिक आणि आपल्या कामाला पूजेसारखं मानणारे असतात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक खूप हुशार आणि चलाख असतात. ते लोकांना ओळखण्यात तरबेज असतात, योग्य वेळ साधतात आणि त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे पूर्ण योजना लपलेली असते.

खरं म्हणजे आजच्या जगात फक्त मेहनत करणारा नाही, तर परिस्थिती आणि खेळ समजून घेणारा माणूस जास्त यशस्वी होतो. तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की तुम्ही मनापासून काम करता, पण त्याचं श्रेय दुसराच घेऊन जातो? किंवा तुमच्या प्रामाणिकपणालाच लोकांनी तुमची कमजोरी समजलं आहे का? चला तर मग, ऑफिसमध्ये लोक तुमचा आदर करतील अशा चाणक्यांच्या काही महत्त्वाच्या नीती जाणून घेऊया.

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा

चाणक्य नीतीनुसार, लोक तुम्हाला मुद्दाम चिडवतील, तुमची प्रतिक्रिया पाहतील आणि त्याचाच वापर तुमच्याविरोधात करतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी लगेच उत्तर देणं गरजेचं नसतं. अनेकदा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं.

डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका

विश्वास ठेवा, पण आधी खात्री करा. कारण आंधळा विश्वास नेहमी नुकसान करून जातो. त्यामुळे लोकांशी मैत्री किंवा संबंध ठेवताना आधी त्यांना नीट ओळखा.

आपली कमजोरी कोणालाही सांगू नका

चाणक्य नीतीनुसार, ऑफिसमध्ये तुमच्या भावना तुमची ताकद नसून कमजोरी ठरू शकतात.

प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा

काम, ई-मेल आणि सूचना यांची नेहमी लिखित नोंद ठेवा. कारण ऑफिसमध्ये सहानुभूतीपेक्षा पुरावे जास्त महत्त्वाचे असतात.

आपली प्रतिमा चांगली ठेवा

तुमचं काम नंतर पाहिलं जातं, पण तुमची प्रतिमा आधी पाहिली जाते. त्यामुळे ऑफिसमध्ये कोणतंही चुकीचं काम करू नका.

निरीक्षण करण्याची सवय लावा

कोण कोणासोबत असतं, कोण कोणाचं कौतुक करतं, कोण कोणाशी अचानक शांत होतं… या सगळ्या गोष्टी खूप काही सांगून जातात.

चाणक्य नीती काय सांगते?

ऑफिसमधील राजकारण तुम्हाला खाली खेचण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतं. जर तुम्ही संयम, योग्य रणनीती आणि प्रामाणिकपणाने ठाम राहिलात, तर एक दिवस आज तुम्हाला दुर्लक्ष करणारेच लोक तुमचा आदर करतील. सरळ राहा, पण भोळे बनू नका. प्रामाणिक राहा, पण सतर्कही राहा. आणि जेव्हा इतर लोक डावपेच खेळतील, तेव्हा तुम्ही तुमच्या नीतीने जिंका.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)