Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथात मानवी जीवनातील अनेक पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्यांनी यामध्ये यश, अपयश, धनलाभ, आर्थिक नुकसान आणि इतर अनेक गोष्टींबाबत महत्त्वाचे विचार मांडले आहेत. तसेच यशस्वी होण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हेही त्यांनी सांगितले आहे. वाचा आजची चाणक्य नीती.
असा व्यक्ती खरा दीन-हीन असतो
श्लोक:
धनहीनो न हीनश्च धनिकः स सुनिश्चयः।
विद्यारत्नेन यो हीनः स हीनः सर्ववस्तुषु।।
श्लोकाचा अर्थ:
आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे पण पैसा नाही, तो दीन-हीन मानला जात नाही. मात्र ज्या व्यक्तीकडे ज्ञानच नाही, त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.
श्लोकाचं सार:
चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीकडे ज्ञानरूपी संपत्ती असते, ती व्यक्ती आयुष्यात सर्व काही मिळवू शकते. त्यामुळे प्रत्येकाने पैसा कमावण्यापूर्वी ज्ञान मिळवण्यावर भर द्यायला हवा. कारण ज्ञान नसेल तर पैसा कमावणे आणि तो टिकवून ठेवणे कठीण जाऊ शकते.
व्यक्तीने स्वतः मेहनत करायला हवी
श्लोक:
स्वहस्तग्रथिता माला स्वहस्तघृष्टचंदनम्।
स्वहस्तलिखितं स्तोत्रं शक्रस्यापि श्रियं हरेत्।।
श्लोकाचा अर्थ:
चाणक्य म्हणतात की, स्वतःच्या हाताने गुंफलेली माळ, स्वतःच्या हाताने उगाळलेले चंदन आणि स्वतःच्या हाताने लिहिलेली देवाची स्तुती यामुळे व्यक्तीला देवराज इंद्रासारखे धन आणि संपत्ती मिळू शकते.
श्लोकाचं सार:
आचार्य चाणक्य यांचा अर्थ असा आहे की, व्यक्ती स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सर्व काही मिळवू शकते. देवाची कृपा मिळवण्यासाठीही प्रयत्न स्वतःच करायला हवेत. इतरांवर अवलंबून राहून काहीच फायदा होत नाही.
श्लोक:
दरिद्रता धीरतया विराजते कुवस्त्रता शुभ्रतया विराजते।
कदन्नता चोष्णतया विराजते कुरूपता शीलतया विराजते।।
श्लोकाचा अर्थ:
चाणक्य म्हणतात की, एखादी व्यक्ती गरीब असली तरी ती धैर्य सोडत नसेल, तर गरिबी तिला कधीच खचवू शकत नाही. जसे साधे कपडे स्वच्छ ठेवले तर तेही चांगले दिसतात. साधे अन्न गरम आणि नीट शिजवलेले असेल तर तेही स्वादिष्ट लागते. तसेच एखादी व्यक्ती दिसायला सुंदर नसली तरी तिचा चांगला स्वभाव तिला आकर्षक बनवतो.
श्लोकाचं सार:
चाणक्य यांच्या मते, व्यक्तीकडे चांगले गुण असतील तर लोक त्याच्या उणिवांकडे लक्ष देत नाहीत. जसे स्वस्त कपडे स्वच्छ असतील तर तेही चांगले दिसतात. साधे जेवणही गरम आणि चांगले शिजवलेले असेल तर ते चविष्ट लागते. त्यामुळे व्यक्तीमध्ये दिखाव्यापेक्षा चांगल्या गुणांना अधिक महत्त्व असणे आवश्यक आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
