Chanakya Niti on Money: धन प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे. पण फक्त पैसा कमावणं पुरेसं आहे का? मौर्य साम्राज्याचे महामंत्री आणि महान रणनीतीकार आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की, शिस्त आणि दूरदृष्टीशिवाय कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही.

आजच्या काळातही त्यांच्या गोष्टी आर्थिक यशाचं मूलमंत्र मानल्या जातात. जर तुम्हाला पैसा यावा आणि टिकावाही असं वाटत असेल, तर हे चार सूत्र समजून घेणं गरजेचं आहे.

पहिलं सूत्र- उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा (How to get rich)

चाणक्यांच्या मते, जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो, तो हळूहळू कर्ज, ताण आणि अपमानाला सामोरा जातो. आजच्या काळात दिखाव्याची सवय माणसाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवते. त्यामुळे आपल्या कमाईतला काही भाग बचतीसाठी ठेवा. हीच सवय भविष्यात आर्थिक स्थैर्याचा मजबूत पाया ठरते.

दुसरं सूत्र- प्रामाणिक मार्गाने कमाई करा

नीती सांगते की, अन्याय, फसवणूक किंवा बेईमानीने मिळवलेला पैसा शेवटी दुःखाचं कारण ठरतो. असा पैसा मनःशांती हिरावून घेतो आणि समाजातील मान-सन्मानही कमी करतो. चाणक्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, शुद्ध आणि प्रामाणिक मार्गाने कमावलेला पैसाच कायम आनंद देतो आणि पिढ्यानपिढ्या समृद्धी टिकवून ठेवतो.

तिसरं सूत्र- संकटासाठी बचत करा

जीवन अनिश्चित आहे. आजारपण, व्यवसायात नुकसान किंवा अचानक आर्थिक अडचण कधीही येऊ शकते. चाणक्यांच्या मते, शहाणा माणूस नेहमी भविष्यासाठी काहीतरी साठवून ठेवतो. आजच्या भाषेत यालाच ‘इमर्जन्सी फंड’ म्हणतात. आपल्या कमाईतला काही टक्का भाग बचतीसाठी ठेवणं हीच शहाणपणाची गोष्ट आहे.

चौथं सूत्र- पैशाची योग्य गुंतवणूक करा

आचार्य चाणक्य मानतात की, फक्त पैसा साठवणं पुरेसं नाही. तो योग्य ठिकाणी लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शिक्षण, कौशल्य, व्यवसाय किंवा मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक पैसा वाढवण्याचं साधन ठरते. नुसता पडून राहिलेला पैसा हळूहळू आपली ताकद गमावतो. त्यामुळे पैसा योग्य ठिकाणी गुंतवा, जेणेकरून तो तुमच्यासाठी काम करेल.

आचार्य चाणक्यांची नीती आजही सांगते की, पैसा हे अंतिम ध्येय नसून एक साधन आहे. शिस्त, संयम आणि दूरदृष्टीने कमावलेला आणि जपलेला पैसा खरा आनंद आणि सन्मान देतो. नाहीतर लक्ष्मी येतेही आणि नकळत निघूनही जाते.

(टीप- या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)