Chinese Garlic Video Viral : लसूण हा आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की भारतात चायनीज लसूणदेखील विकला जात आहे, ज्याच्यावर सरकारने २०१४ मध्येच बंदी घातली होती. हा लसूण फायदा देण्याऐवजी तुम्हाला आजारी पाडू शकतो. यामध्ये अनेक हानिकारक घटक असतात, जे तुमचे चयापचय (मेटाबॉलिझम) आणि शरीराचे कार्य बिघडवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया की चायनीज लसूण नेमका ओळखायचा कसा…

भारतात चायनीज लसणावर बंदी का घालण्यात आली?

स्वतंत्र पत्रकार शरद शर्मा यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले की, भारतात २०१४ पासून चायनीज लसणावर बंदी आहे. यामागे प्रामुख्याने ३ कारणे आहेत:

१) या लसणामध्ये बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन) आढळून येत होता.

२) याच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायने, खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जात होता.

३) लसूण अधिक पांढरा आणि चमकदार दिसण्यासाठी क्लोरीनचा (ब्लिचिंग) वापर केला जात होता.

शास्त्रज्ञांनी मानले आजारांचे मूळ

केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये चायनीज लसणावर बंदी आहे. युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या अहवालानुसार, ज्या अन्नात रसायने, खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर होतो, त्यामुळे मज्जासंस्थेचे नुकसान (नर्व्हस सिस्टीम डॅमेज), संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इमबॅलेन्स) आणि कर्करोगाचा (कॅन्सर) धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

चायनीज लसूण ओळखायचा कसा?

बंदी असूनही आजही देशाच्या कोणत्याही भागात चायनीज लसूण सहज पाहायला मिळतो. याचविषयी sharadsharma.official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात व्यापारी जितेंद्र यांनी चायनीज लसूण ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.

सर्वसामान्य नागरिक चव आणि वासावरून याची ओळख पटवू शकतात. चायनीज लसणाचा वास खूप कमी असतो. तसेच त्याची चवही कमी तिखट आणि सौम्य असते. याउलट भारतीय देशी लसणाचा वास तीव्र असतो आणि त्याची चव चांगली तिखट व उग्र असते. तसेच चायनीज लसूण आकाराने मोठा असतो. जो सोलायला सोपा वाटतो. यावरून चायनीज आणि भारतीय लसणातील फरक सहज लक्षात येतो.

अधिकारी कशी करतात ओळख?

माती चाचणीद्वारे (सॉईल टेस्ट) अधिकारी आणि सरकार चायनीज लसणाची ओळख पटवतात. ज्याप्रमाणे प्रत्येक राज्याची माती वेगवेगळी असते, तसेच प्रत्येक देशाच्या मातीचे गुणधर्मही वेगवेगळे असतात, त्यामुळे सॉईल टेस्टद्वारे तो कुठे पिकवला गेला आहे हे सहज स्पष्ट होते.