Chanakya Niti for Happy Family : संकटाच्या वेळी फक्त तुमचे कुटुंबच ढाल बनून उभे राहते. माणूस कितीही आधुनिक झाला तरी, समाधानाचा अनुभव कुटुंबातूनच मिळतो; कुटुंबाशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. आनंदी कुटुंबात मानसिक आरोग्य चांगले राहते आणि कौटुंबिक समस्याही कमी होतात. त्यामुळे चांगले कुटुंबच पुढे एका निरोगी आणि चांगल्या समाजाची निर्मिती करण्यास हातभार लावते.

सुखी कुटुंबात असल्यामुळे कामांची विभागणी होते. मुलांना संगोपन मिळते, जे त्यांच्या विकासासाठी महत्वाचे असते. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथामध्ये आनंदी कुटुंबाचे वर्णन केले आहे. चाणक्य नीतीनुसार, कुटुंबात आनंद टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. या प्रयत्नांमुळे सकारात्मकता वाढते, जी जीवनात आनंद आणते.

कोणत्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी नेहमीच नांदते?

कुटुंबात आनंद टिकवून ठेवण्यासाठी, प्रत्येकाने सर्व कामे प्रामाणिकपणे केली पाहिजेत. ज्या कुटुंबात प्रत्येकजण कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने पैसे कमावतो असे कुटुंब नेहमी आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण असते. अशा लोकांना समाजात आदरही मिळतो.

चाणक्य नीतीनुसार, ज्या घरात गरजेनुसार पैसा खर्च केला जातो असे घर नेहमीच सुखी असते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला पैशाच्या योग्य वापराचे ज्ञान असले पाहिजे, ज्यामुळे जीवनात प्रगतीच्या संधी निर्माण होतात आणि भविष्यासाठी पैसे वाचवण्यास मदत होते.

चाणक्यांच्या मते, ज्या कुटुंबातील मुले बुद्धिमान आणि पत्नी मृदुभाषी असते, ते कुटुंब नेहमीच सुखी असते आणि घरात समृद्धीही नांदते.

कोणत्याही घराला घरपण देण्यात स्त्री महत्त्वाची भूमिका बजावते. चाणक्याच्या मते, ज्या घरात स्त्रिया कुटुंब सुखी राहण्यासाठी प्रयत्न करतात. ते घर नेहमीच धन्य असते आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही दूर होते.

कुटुंबप्रमुख कुटुंबात एक महत्त्वाची भूमिका बजावतो. तो कोणताही आळस न करता प्रत्येकाच्या समस्या सोडवतो. ज्या घरात कुटुंबप्रमुख कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी समान नियम व कायदे ठरवतो, ते घर नेहमीच धन्य असते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)