Difficult Times Reveal These Hidden Traits of Person’s Character : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे बोलण्यात खूप गोड असतात. पण, वेळ पडल्यावर साथ देत नाहीत. अशा खोटा दिखावा करणाऱ्या लोकांना ओळखणे हे आजच्या काळातील मोठे आव्हान आहे. जे आपल्यासमोर एक आणि पाठीमागे दुसरेच वागतात. अनेक लोक आपल्या मनातील भीती आणि असुरक्षितता लपवण्यासाठी स्वतःला श्रेष्ठ असल्याचे भासवतात.

तर आचार्य चाणक्यांनी त्यांच्या ‘नीती’ या ग्रंथात अशा खोट्या लोकांना ओळखण्याचा एक सोपा मार्ग सांगितला आहे, जे गोड बोलतात पण कठीण काळात आपल्याला साथ देण्याऐवजी मागे हटतात. चाणक्यांचा असा विश्वास होता की, एखाद्याच्या गोड शब्दांवर विश्वास ठेवण्याऐवजी, त्याच्या सवयी, वागणूक आणि निर्णयांकडे लक्ष दिले पाहिजे. चला, आचार्य चाणक्यांनी सांगितलेली काही चिन्हे पाहूया, जी तुम्हाला खरे आणि खोटे लोक सहजपणे ओळखण्यास मदत करतील.

स्वार्थी

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की, एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखण्याचा खरा मार्ग म्हणजे जेव्हा ती व्यक्ती स्वार्थी आहे का तपासणे. जेव्हा तिची स्तुती केली जाणार नसते किंवा त्याचा कोणताही वैयक्तिक फायदा होणार नसतो. अशा वेळी व्यक्तीचा खरा स्वभाव दिसून येतो. जर एखाद्या व्यक्तीचा चांगुलपणा केवळ स्वतःच्या फायद्यापुरता मर्यादित असेल. तर अशा व्यक्तीला टाळणे उत्तम राहील राहील.

जबाबदारी

आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि कामे पूर्ण करण्यापासून सतत पळ काढते, अशा व्यक्तीपासून सावध राहावे आणि शक्यतो दूर राहावे. एखादी व्यक्ती कितीही मोठमोठी आश्वासने देत असली, तरी ती प्रत्यक्षात आपली जबाबदारी पार पाडत नसेल. तर तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ करणे, विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे न देणे किंवा महत्त्वाच्या विषयांवर बोलणे टाळणे, या गोष्टींमधून त्या व्यक्तीचा खरा स्वभाव समोर येऊ शकतो.

ताण आणि समस्या

आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की, जीवनातील ताण आणि संकटे व्यक्तीचे खरे स्वरूप उघड करतात. जेव्हा एखादी व्यक्ती दबावाखाली असते. तेव्हा तिचा खरा स्वभाव दिसून येतो. जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक असते, तेव्हा व्यक्ती प्रामाणिक राहते, शांत राहते की आक्रमक होते याकडे लक्ष दिले पाहिजे. कठीण काळात दिसून येणारा स्वभाव हा खोलवर रुजलेल्या सवयींचे प्रतिबिंब असतो.

निष्ठा

आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीची निष्ठा ओळखताना केवळ तिच्या गोड बोलण्याला किंवा स्तुतीला महत्त्व देऊ नये. त्याऐवजी ती व्यक्ती आपल्याशी किती आदराने वागते आणि आपल्या विचारांना किती महत्त्व देते, हे पाहावे. एखाद्या व्यक्तीबद्दल एका प्रसंगावरून लगेच मत बनवू नये. तर ती व्यक्ती वेगवेगळ्या प्रसंगी कशी वागते, याकडे लक्ष द्यावे. कारण एखाद्या व्यक्तीचे खरे स्वभाववैशिष्ट्य तिच्या वारंवार दिसणाऱ्या वागण्यातून समजते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)