आपल्या आयुष्यात असे प्रसंग फार क्वचित येतात ज्यात आपल्याला आपल्या आयुष्याचे खरे उद्दिष्ट काय आहे याची जाणीव होते. ती होऊन देखील जीवनाच्या रहाटगाडग्यात आपण आपल्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करण्यास असमर्थ ठरतो. परंतु, एका छोट्या मुंबईकराला आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट काय याची केवळ जाणीवच झाली नाही तर त्या दिशेने तो झपाट्याने मार्गक्रमण करीत आहे.

मागील वर्षीच अमेरिकेतून भारतात आलेल्या एका १३-१४ वर्षाच्या मुलाची कथा ह्युमन्स ऑफ बॉम्बे या लोकप्रिय फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये तो मुलगा सांगतो की मी माझे आयुष्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना आनंदी करण्यासाठी समर्पित करणार आहे. त्याच्या या पोस्टला २००० पेक्षा अधिक शेअर मिळाले आहेत आणि कित्येकांनी त्याला प्रोत्साहनपर शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

मागील वर्षी मी जेव्हा अमेरिकेतून मुंबईत राहायला आलो तेव्हा मला माझ्या आईने अर्नेस्ट बोर्जेस मेमोरियल होम या रुग्णालयात दिवाळी साजरी करण्यासाठी नेले. तेथे कॅन्सरवर उपचार घेणारी अनेक मुले होती. उद्याची पहाट आपण पाहणार की नाही याची शाश्वतीदेखील त्यांना नव्हती परंतु, ती मुले आनंदी आणि समाधानी वाटत होती.

या गोष्टीने मी भारावलो आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करू लागलो. अनेक लहान सहान गोष्टींबद्दल कुरबुर करणाऱ्या माझ्या मनाला ही गोष्ट जरा वेगळी वाटली आणि मी त्याबद्दल विचार करू लागलो असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. तेथे एक आदित्य नावाचा छोटा मुलगा होता. त्याच्यावर केमोथेरपी सेशन्स चालू होते. त्याच्याशी ओळख झाल्यावर त्याच्या आईने आम्हाला त्याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

केमोथेरपीचे सेशन्स झाले की तो प्रचंड थकतो परंतु जेव्हा तुम्ही त्याच्यासमोर क्रिकेटचे नाव काढाल तर त्याच्या डोळ्यात एक चमक येते. आदित्यला क्रिकेटची इतकी आवड आहे की तो एखाद्या दुकानासमोर उभा राहून तासन तास क्रिकेट पाहू शकतो. आदित्यचे एकच स्वप्न होते की एकदा लाइव्ह क्रिकेट मॅच पाहायची. त्यानंतर मी त्याच्यासाठी दोन व्हीआयपी पासची व्यवस्था केली आणि त्याला घेऊन आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गेलो.

पूर्ण सामना होईपर्यंत तो आपल्या पायावर उभा होता आणि आनंदाने टाळ्या वाजवून आपल्या संघाला चीअर अप करीत होता. सामना संपल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद होता. केवळ सामनाच नव्हे तर सामना पाहताना आपण इतका खाऊ खाल्ला की एकावेळी इतके सारे कधीच खाल्ले नव्हते असे त्याने निरागसतेनी म्हटले. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला एकच गोष्ट करावीशी वाटली ती म्हणजे आदित्य सारखी जी मुले आहेत त्यांनादेखील आनंदी करायचे.

त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येईल असे काही करायचे. तेव्हापासून मी त्यांच्यासाठी पैसे गोळा करीत आहे. आतापर्यंत मी नर्गिस दत्त फाउंडेशनसाठी ७-८ लाख रुपये जमा केले आहेत असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. मी माझ्या वयाच्या मुलांना एवढेच सांगू इच्छितो की जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही तुमचे थोडेसे खर्च कमी करा आणि अशा मुलांसाठी ते द्या.

ख्रिसमसची यापेक्षा अधिक काय चांगली भेट असू शकेल. ते दिल्याने तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही परंतु त्यांच्यासाठी ते भरपूर काही असेल असा संदेश त्याने आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. त्याची ही पोस्ट ऐकून खूप जणांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतक्या लहान वयात इतकी परिपक्वता कशी येऊ शकते याबदद्लही काही जणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.