बेळगावमधील गोकाक तालुक्यातील कोन्नूरमधील मर्डीमठ गावात करोनाला हद्दपार करण्यासाठी सोडण्यात आलेल्या घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर या घोड्याच्या अंत्यस्कारासाठी शेकडोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याची माहिती समोर आली आहे. करोनाचा नाश करण्यासाठी देवाला सोडण्यात आलेल्या घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले. करोनामुळे या अंत्यसंस्काराला गर्दी करु नका असं आवाहन आधी करण्यात आलं होतं. मात्र नंतर या आवाहानकडे दूर्लक्ष करुन शेकडोंच्या संख्येने नागरिक या घोड्याला शेवटचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झाले.

कर्नाटकमध्ये सध्या करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे करोना नियमांचे पालन करत अंत्ययात्रेला गर्दी करु नका असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही या अंत्यविधीला रस्त्यावर उतरलेल्या गावकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. या प्रकरणात आयोजकांसहीत १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मर्डीमठ हे गावही १४ दिवसांसाठी सील करण्यात आलं आहे.

अशाप्रकारे अंधश्रद्धेमुळे शेकडोंच्या संख्येने एखाद्या गावातील नागरिकांनी करोना कालावधीमध्ये एकत्र येण्याची ही काही देशातील पहिलीच घटना नाहीय. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील बुंदेलखंडमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता.  निवाडी जिल्ह्यामध्ये  करोना हा देवीचा प्रकोप असल्याचं समजून शेकडो महिला, पुरुष आणि लहान मुलं टोळ्याटोळ्यांनी हातामध्ये पाण्याचे कलश घेऊन येथील अछरुमाता मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी आणि प्रकोपापासून वाचवण्याची मागणी देवीकडे करण्यासाठी पोहचले होते. या कलश यात्रेदरम्यान करोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसून आलं. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आलं आहे. अनेकांनी मास्कही घातले नव्हते. करोना निर्बंधांमुळे मंदिर बंद असल्याने गावकऱ्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच अभिषेक केला. निवाडी जिल्ह्यातील पृथ्वीपूर आणि आजूबाजूच्या गावातील अनेक गावकरी टोळ्याटोळ्यांनी अछरुमाता मंदिराच्या दिशेने चालू लागले. पोलिसांनी या लोकांना पृथ्वीपूरजवळच थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्यांचं काहीही न ऐकता मंदिराकडे जाणार असल्याचं सांगितल्याने पोलिसही हतबल दिसून आले. देशातील इतर भागांमधूनही अशाच प्रकारच्या काही घटना समोर आल्यात.