Crocodile attack on crocodile: मगर हा सर्वांत धोकादायक शिकारी मानला जातो. कोणताही जीव त्याच्यासमोर आला, तर तो त्याला सोडत नाही. अगदी शिकारीला काही कळण्याच्या आतच मगर त्याची शिकार करते. मगरीसमोर जंगलाचा राजा सिंह, वाघ, बिबट्या अशा खतरनाक प्राण्यांचेही काही चालत नाही. मगर शिकार करतानाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, जे अनेकदा व्हायरल होतात. सध्या व्हायरल होणारा असाच आणखी एक व्हिडीओ हैराण करून सोडणारा आहे. मगरीच्या शिकारीचा हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण- मगरीनं स्वतःच्याच साथीदाराचा जीव घेतला आहे. एका वन्यजीवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यातील दृश्य पाहिल्यानंतर तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये एका भुकेल्या मगरीने दुसऱ्या मगरीलाच आपले भक्ष्य बनवले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये मगरीने मोठ्या आकाराच्या मगरीला जबड्यात दाबले आहे. नेचर इज अमेझिंग (@AMAZlNGNATURE) या हॅण्डलसह 'X' (पूर्वीचे ट्विटर) सोशल साइटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. १.३० मिनिटांच्या या क्लिपच्या सुरुवातीला मगरीचे तरंगणारे जबडे दिसत आहेत. ती मृत मगर पाण्यात तरंगत असल्याचे दिसते. काही सेकंदांनंतर एक मोठी जिवंत मगर दिसते. त्या मगरीने दुसऱ्या मगरीला जबड्यात पकडले होते. ही क्लिप थोडी पुढे सरकली असता, एका मगरीने दुसऱ्या मगरीची शिकार केल्याची घटना स्पष्ट होते. या फुटेजच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, "मला याची अपेक्षा नव्हती." (हे ही वाचा : जीवाशी खेळ! रेल्वेस्थानकावर छोट्या मुलासह दोन महिला सरकता जिना चढत असताना केला खेळ अन्… प्रवाशांनो ‘हा’ VIDEO बघाच) वन्यजीवांच्या जगात, भक्षक प्राण्यांनी स्वतःच्या प्रजातीची शिकार करणे सामान्य गोष्ट नाही. अशा परिस्थितीत या क्लिपने लोकांना धक्का दिला आहे. हे दृश्य सोशल मीडियावर १.८ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहे आणि त्याचे व्ह्युज वेगाने वाढत आहेत. टिप्पण्यांमध्ये काही वापरकर्त्यांनी व्हिडीओ सामायिक केले आहेत; ज्यामध्ये मोठ्या आकाराच्या मगरी आणि इतर मगरी त्यांच्या स्वत: च्या प्रजातींची शिकार करतात आणि खातात हे स्पष्ट होते. येथे पाहा व्हिडीओ या फुटेजवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी त्यांना क्रूर शिकारी मानले; तर काहींनी त्यांची तुलना डायनासोरशी केली. एका युजरने कमेंट केली, "वाइल्ड लाईफ. एक तर तू अन्न खाशील; नाही तर अन्न बनशील." दुसऱ्याने लिहिले, "मगर दुपारच्या जेवणासाठी मगर खात आहे. हे खरे आहे का?" आणखी एका X वापरकर्त्याने लिहिले, "हा शिकारी हुशार आहे. भविष्यात केवळ अन्नच नाही, तर शिकारींमधील स्पर्धाही संपुष्टात येईल." अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.