Cute viral video: सोशल मीडियावर कधी भारी डान्स तर कधी भन्नाट कॉमेडी व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, कधी-कधी एखादा साधा, घरगुती आणि मनाला भिडणारा क्षण लोकांच्या भावनांना इतका स्पर्श करून जातो की तो लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. सध्या असाच एक कौटुंबिक, भावूक करणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. यात वाद, रुसवे-फुगवे, कौटुंबिक नात्यांतील कोमलता आणि बाप-लेकीचं सुंदर नातं हे सगळं एका छोट्या व्हिडीओमध्ये दिसतं.

घरात कधी किरकोळ गोष्टींवरून नवरा बायकोची भांडणं होतच असतात हे काही नवीन नाही. कधी नवरा रुसतो तर कधी बायकोचा मूड बिघडतो. मात्र, अशा क्षणी घरातलं वातावरण हलकं करणारे असतात घरातील लहानगे. अशाच प्रसंगावर आधारित हा व्हिडीओ आहे. बायको नाराज झाल्यानंतर नवऱ्याने स्वतः स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये घेतलेली धाव आणि त्याच्यासोबत त्याची चिमुकली मुलगी बाबांना मदत करत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ‘@littlesunshineaayra’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतं की, बायको रुसल्यानंतर नवरा किचनमध्ये उभा राहून गॅसवर भाजी बनवत आहे. ओट्याजवळ त्याची अडीच वर्षांची मुलगी बसली असून बाबांसारखेच तीही कामाला लागली आहे. तिच्या समोर पीठ ठेवलेलं आहे आणि ती आपल्या नाजूक हातांनी चपाती करण्याचा प्रयत्न करते.

पाहा व्हिडिओ

कधी पीठ हातावर घेते, कधी हाताने गोल करण्याचा प्रयत्न करते, कधी बाबांकडे बघून खात्री करते की मी बरोबर करतेय ना?’ तिच्या चेहऱ्यावरील निरागस एकाग्रता आणि छोट्या छोट्या हालचाली पाहून कुणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल. हा बाप-लेकीचा संवाद शब्दांशिवाय प्रेम दाखवणारा आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होताच प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. अनेकांनी ‘ही लहान मुलगी किती छान चपाती बनवतेय’, ‘किती क्युट आहे ही’, ‘ही छोटी मदत म्हणजे खूप मोठं प्रेम’ अशा प्रतिक्रिया दिल्या. काहींनी मजेशीरपणे लिहिलं, “काय काय करावं लागतं बाप रे!”, तर काहींनी आईकडे इशारा करत लिहिलं, “मम्मीच हा व्हिडीओ शूट करतेय बहुतेक!” एका युजरने तर विनोदी अंदाजात म्हटलं, “ही मुलगी माझ्या मुलासाठी पाहिजे!”